Maharashtra Politics: “बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती”; रोहित पवारांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 03:02 PM2023-04-05T15:02:09+5:302023-04-05T15:03:05+5:30
बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान का मिळणार नाही, हे रोहित पवार यांनी गणित मांडून सांगितले.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध विषयांवरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप यांच्यात सातत्याने खटके उडताना दिसत आहेत. यातच मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असताना, मित्रपक्षही याकडे डोळे लावून बसले असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या बच्चू कडू यांनीही उघड नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही, हे आता अख्ख्या महाराष्ट्राला कळलेले आहे, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
सरकारचा एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असताना कोर्टातही त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे सध्याचे सरकार लोकांचा आणि जनतेचा विचार करत नाही. त्यांना फक्त भाजपच्या काही लोकांना आणि शिंदे यांच्या ४० लोकांना खुश ठेवायचे काम सुरू असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. तसेच यावेळी बोलताना बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात स्थान का मिळणार नाही, याची गोळाबेरीज रोहित पवार यांनी सांगितली.
बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती
एकनाथ शिंदे गटातल्या ४० जणांनाही मंत्रिपद हवे आहे. तसेच भाजपच्याही अनेक नेत्यांना मंत्रिपद पाहिजे. रेशो काढला तर पाच आमदाराच्या मागे एक मंत्रिपद येऊ शकते. अशा स्थितीत एकनाथ शिंदेंचा गट १२ च्या पुढे किंवा १४ पर्यंत राहील. बाकीच्या २६ लोकांना काय मिळणार? त्याला एक पर्याय आहे. आपल्याकडे अनेक मंडळे आहेत. यांनी मंडळे वाढवले आहेत. अधिवेशनात त्यांना निधी दिलेला नाही. फक्त भाषण केले. जेव्हा मंडळे येतील तेव्हा आमदारांना त्यांचे वाटप होईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा दावा रोहित पवार यांनी केला.
दरम्यान, राजकीय लोक ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर राजकारण घेऊन जात आहेत. ते महाराष्ट्राच्या भविष्याशी खेळत आहेत. अशा वक्तव्यांतून तरुणांची पोटे भरणार नाहीत. त्यांच्या हाताला काम मिळणार नाही. आपल्या आधीच्या पिढीने ज्या स्मृती जपल्या त्याला तडा देत आहात, या शब्दांत रोहित पवार यांनी कानपिचक्या दिल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"