Rohit Pawar: “द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलणार नाही, राज्याची संस्कृती ते होऊ देणार नाही”: रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 07:04 PM2022-04-21T19:04:02+5:302022-04-21T19:04:51+5:30
Rohit Pawar: पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
मुंबई: राम नवमी आणि हनुमान जयंतीला देशातील काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारावरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरल्यामुळे यात आता भर पडली आहे. देशात जातीय मुद्द्यावरून हिंसाचार होत असताना मोदी सरकार गप्प का, अशी विचारणा केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर टीका केली आहे. द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलणार नाही, राज्याची संस्कृती ते होऊ देणार नाही, या शब्दांत निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासंबंधी मागणी केल्यानंतर त्यावरून राज्यात वातावरण तापले आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या असून, गेल्यावर्षी याच काळात कोरोनाची दुसरी लाट होती. त्या काळात बाकी सर्व गोष्टी माणसे कोरोनाशी दोन हात करीत होते. आता चित्र वेगळे दिसत आहे. यावर सोशल मीडियात तुलनात्मक चर्चा सुरू झाली आहे. याचाच धागा पकडून रोहित पवार यांनी ट्विटवर मतप्रदर्शन केले आहे.
पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत
मागच्या वर्षी सर्व धार्मिक स्थळं बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरुन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन, बेड, औषधं यांसाठी हातात हात घालून लढत होतो. म्हणून माणुसकी जिंकली आणि आपण त्या संकटाला परतून लावलं. पण आज पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत.
आपली संस्कृतीही तसे होऊ देणार नाही
रोहित पवार यांनी एकामागून एक ट्विट करत भाजपसह राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कुणाला वाटत असेल करोना काळात दिसलेली माणुसकी विसरली जाईल. आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलेल किंवा काहींना वाटत असेल आपली राजकीय भाकरी भाजली जाईल, पण महाराष्ट्रात ते शक्य नाही आणि आपली संस्कृतीही तसे होऊ देणार नाही, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.