“इजा ‘कानाला’ नाही, ‘मनाला’ झालेली होती, ती परवडणारी नसल्यानेच नवीन जाहिरात दिली”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 12:35 PM2023-06-14T12:35:42+5:302023-06-14T12:36:43+5:30
Rohit Pawar News: सरकारने कामे केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती, अशी टीका करण्यात आली आहे.
Rohit Pawar News: ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या टॅगलाईनखाली एक जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिरिक्त कोणाही अन्य नेत्याचा फोटो देण्यात आला नव्हता. यावरून नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावरून महाविकास आघाडीचे नेते भाजप-शिवसेना शिंदे गटावर खोचक टीका करत आहेत. जाहिरात प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर निशाणा साधला.
आधीच्या जाहिरातीनंतर आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो असलेली नवीन जाहिरात देण्यात आली. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांसह शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो देण्यात आले आहेत. रोहित पवार यांनी दोन्ही जाहिरातींची फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये रोहित पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
इजा ‘कानाला’ नाही, ‘मनाला’ झालेली होती
रोहित पवार ट्विटमध्ये म्हणतात की, इजा 'कानाला' झालेली नव्हती तर 'मनाला' झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी. असो! सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती.त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळंच राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय... यांच्या काही नेत्यांना पदं मिळाली पण सामान्य नागरिक मात्र अडचणीत आलाय.. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत असल्याने बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का? असा सवाल रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून केला.
इजा 'कानाला' झालेली नव्हती तर 'मनाला' झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 14, 2023
असो!
सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती.
त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल?… pic.twitter.com/fTj08TFJcg
दरम्यान, आधीच्या जाहिरातीवरून आम्ही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, आता भाजपच्या आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकलेली दिसते. पडद्यामागे काय गोष्टी घडल्यात हे मला माहिती आहे. जाहिरातीचा प्रकार हा सगळा हास्यास्पद प्रकार झाला. त्यांच्या मनात काय ते यावरून स्पष्ट झाले. त्यानंतर आता नवीन जाहिरातीत चित्र बदलेले असले तरी प्रत्यक्षात सगळे आलबेल नाही, हे स्पष्ट दिसत आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.