रोहित पवारांनी सांगितली 'त्या' मिरवणुकीमागची गोष्ट; उधळलेल्या गुलालाबद्दल फेसबुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 01:00 PM2019-11-02T13:00:21+5:302019-11-02T13:21:05+5:30
कर्जत-जामखेडमध्ये रोहित यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावरून रोहित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली.
मुंबई - कर्जत-जामखेडमध्येरोहित पवार यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाचे मंत्री राम शिंदे यांना पराभूत करत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार जायंट किलर ठरले आहेत. रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आणि जनतेची मने जिंकली आहेत. लोकसभा निवडणूकांपासूनच रोहित यांनी मतदारसंघातील जनतेमध्ये स्वत:ला एकरुप केलं होतं. येथील जनतेनंही रोहित यांच्यावर प्रेम करत त्यांना आपला आमदार बनवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये गेले होते. तर दुसरीकडे कर्जत-जामखेडमध्ये रोहित यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावरून रोहित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली.
कर्जत-जामखेडमध्ये शुक्रवारी (1 नोव्हेंबर) रोहित पवार यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 30 जेसीबी आणि 10 क्रेन्सच्या मदतीने गुलालाची उधळण केली. कर्जतमधील मिरवणुकीतील जल्लोषावरील टीकेनंतर रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. शेतकऱ्यांना दुखवण्याचा हेतू नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'सर्वांनी मिळून मोठ्या आनंदात मिरवणूक काढली. त्यांच्या आनंदात मी सहभागी झालो. पण यामध्ये कुठेही शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मी बांधिलकी जपतो ती या मातीशी अन् लोकांशी. आपल्या आनंदामुळे एकाही व्यक्तीचा अपमान व्हावा, त्यांना वाईट वाटावं असा माझा कधीच हेतू नव्हता व भविष्यात देखील नसेल' असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी 'आपल्या आनंदामुळे अगदी एका व्यक्तीला जरी वाईट वाटलं तर आपण त्या एका व्यक्तीचा विचार करायला हवां हेच मी लहानपणापासून शिकलो. कालचा दिवस हा माझ्यासाठी व कर्जत जामखेडच्या सर्वसामान्य मतदारांसाठी विशेष होता. कर्जत जामखेड हे माझं घर आहे अस मी मानत आलेलो आहे... स्वच्छ मनाने आणि अधिक वेगाने सामाजिक काम यापुढे करत राहिलं. सर्वसामान्य लोक, कार्यकर्ते व हितचिंतक हेच माझं बळ आहे. कोणाला उत्तर देण्यासाठी नाही तर एकाही व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून अगदी स्वच्छ मनाने आपणासमोर या गोष्टी मांडतोय' असं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी विजयी सभेला संबोधित करताना रोहित यांनी आपल्यातील संयमी आणि संस्कृत राजकीय नेत्याचं दर्शन घडवलं होतं. रोहित यांनी आपल्या विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना, राम शिंदेंबद्दल आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना जागीच थांबवलं. तसेच, या घोषणेऐवजी शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणा देण्याचं सूचवलं. विशेष म्हणजे स्वत:च या घोषणेची सुरुवात केली. कोण आला रे कोण आला.... राम शिंदेंचा बाप आला.... अशा घोषणा रोहित यांच्या समर्थकांनी दिल्या होत्या. या घोषणेला रोहित यांनी तात्काळ आक्षेप घेतला. कृपया अशा घोषणा देऊ नका, आपण पवारांचे कार्यकर्ते आहोत. अशा घोषणा देऊ नका म्हणत रोहित यांनी या घोषणा थांबवल्या. त्यानंतर, स्वत: च पवारसाहेब तुम आगे बढो.... हम तुम्हारे साथ है... अशी घोषणाबाजी केली. रोहित यांच्या या एका कृतीने अनेकांची मने जिंकली. सोशल मीडियावर रोहित यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.