Maharashtra Politics: भाजपमधील कोणता नेता सर्वात जास्त आवडतो?; रोहित पवारांनी दोनच शब्दांत दिले स्पष्ट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 09:37 AM2023-04-10T09:37:44+5:302023-04-10T09:39:14+5:30
Maharashtra News: कोणते मंत्रिपद भूषवायला आवडेल? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. याला रोहित पवारांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेते सडकून टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार हेदेखील सातत्याने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असतात. यातच रोहित पवार यांना कोणता भाजप नेता आवडतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
रोहित पवार यांनी #AskRohitPawar या हॅशटॅगने नेटिझन्सला कोणतेही प्रश्न विचारायचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नेटिझन्सकडून भन्नाट प्रश्न विचारण्यात आले. रोहित पवार यांनीही दिलखुलास उत्तरे दिली. एका युझरने विलासराव देशमुखांविषयी दोन शब्द सांगण्याचे ट्विट केल्यावर रोहित पवारांनी त्याला ‘निष्ठा आणि कर्तृत्व’ असे उत्तर दिले. तर एका युझरने आजोबा शरद पवारांकडून तुम्हाला काय शिकायला मिळाले? असा प्रश्न विचारला. त्यावर रोहित पवार यांनी उत्तर देताना ‘गरम वातावरणात डोके कसे शांत ठेवले पाहिजे’, असे उत्तर दिले.
रोहित पवारांना भाजपामधला कोणता नेता आवडतो?
रोहित पवारांना भाजपामधला कोणता नेता आवडतो? असा प्रश्न एका ट्विटर युझरने केला. यावर विरोधी पक्षातल्या नेत्याविषयी बोलताना कोणताही आढावेढा न घेता रोहित पवारांनी ‘गडकरी साहेब’ असे दोन शब्दांत उत्तर देत नितीन गडकरी यांचे नाव घेतले. तसेच कोणते मंत्रिपद भूषवायला आवडेल? असा प्रश्न एका युझरने रोहित पवार यांना विचारला असता त्यावर ‘पद महत्त्वाचे नसले, तरी जिथे युवांच्या हाताला काम देता येईल, असे मंत्रिपद नक्कीच आवडेल’, असे सूचक उत्तर रोहित पवार यांनी दिले.
दरम्यान, एका युवतीने तर आपले एका तरुणावर प्रेम असून घरचे लग्नाला तयार नाहीत, तर दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतलाय, तुमच्या मते मी काय करायला हवे? असा प्रश्न विचारला असता ‘पळून जाण्यासाठी आई-वडिलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसे नक्की करा!’ असा सल्ला रोहित पवार यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"