“राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये”; रोहित पवारांनी भाजपला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 01:45 PM2023-05-31T13:45:56+5:302023-05-31T13:51:30+5:30
राजकारण काय असते हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.
Maharashtra Politics: राज्यातील राजकारणात अनेकविध घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपला सुनावत, राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये, असा इशारा दिला आहे.
रोहित पवार यांनी चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच, यानिमित्ताने रोहित पवार या भागात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे राजकारण करू नये, असा अप्रत्यक्ष सल्ला रोहित पवारांना दिला. अहिल्यादेवी होळकर यांचं चौंडी हे जन्मस्थळ आहे. कुणीही राजकीय गोष्टी केल्या तर त्याचा इथे उपयोग होणार नाही. इथे राजकारणाला वाव नाही, असे राम शिंदे यांनी म्हटले होते. याला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले.
राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये
राजकारणाच्या बाबतीत मला वाटते की पवारांना त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. त्यामुळे पवार कधीही सामाजिक कार्यक्रमात किंवा जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण करत नाहीत. ज्या ठिकाणी खरेच राजकारण करायला हवे, तिथेच पवार राजकारण करतात. राजकारणाच्या बाबतीत पवारांच्या नादी कुणीही लागू नये, या शब्दांत रोहित पवार यांनी पलटवार केला.
दरम्यान, राजकारण कोण करते आहे, असा प्रतिप्रश्न विचारत, कार्यकर्ता म्हणून इथे येणाऱ्या लोकांना सेवा मिळते की नाही हे आम्ही बघत आहोत. याला जर ते राजकारण म्हणत असतील, तर तो त्यांचा विषय आहे. त्यांना राजकारणाशिवाय दुसरे काही कळत नाही. आम्हाला समाजकारणाशिवाय काही कळत नाही. समाजकारण काय असते हे आम्ही दाखवून देत आहोत. राजकारण काय असते हे ते त्यांच्या वक्तव्यावरून दाखवून देत आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली.