“जितेंद्र आव्हाडांचे विधान या वातावरणात योग्य वाटले नाही”; रोहित पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 01:57 PM2024-01-06T13:57:35+5:302024-01-06T13:58:56+5:30

Rohit Pawar Vs Jitendra Awhad: श्रीरामांबाबत केलेल्या विधानानंतर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता.

ncp rohit pawar replied jitendra pawar criticism about lord rama objectionable statement | “जितेंद्र आव्हाडांचे विधान या वातावरणात योग्य वाटले नाही”; रोहित पवार स्पष्टच बोलले

“जितेंद्र आव्हाडांचे विधान या वातावरणात योग्य वाटले नाही”; रोहित पवार स्पष्टच बोलले

Rohit Pawar Vs Jitendra Awhad: मला जे योग्य, अयोग्य वाटते, ते मी बोलून दाखवितो. मनात वेगळे आणि मुखावर वेगळे ठेवत नाही. जितेंद्र आव्हाड यांचे विधान या वातावरणात योग्य वाटले नाही, म्हणून मी बोलून दाखविले. त्यानंतर माझ्याबद्दल ते स्वतः बोलले आहेत. त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी दिले.

राम आपला बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. या वक्तव्यावर रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली होती. रोहित पवार यांच्या भूमिकेवर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, रोहित पवार हे लहान असून ते आमदार म्हणून नवखे आहे. त्यांची पहिलीच टर्म आहे. त्यांना मी फार महत्त्व देत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

देव, धर्मावर जेव्हा कुणी राजकीय प्रतिक्रिया द्यावी, हेच भाजपाला हवे असते

देव, धर्मावर जेव्हा कुणी राजकीय प्रतिक्रिया द्यावी, हेच भाजपाला हवे असते. बेरोजगारी, महागाई सारखे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प राज्याबाहेर आणि गुजरातमध्ये जात आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. सरकारकडून कोणतेही भाष्य केले जात नाही. अशावेळी जेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी देव-धर्मावर विधान केले, तेव्हा सरकारला आयता विषय मिळाला. सामान्य माणसाच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी ते याच विषयावर आंदोलन करताना दिसतात. धर्म हा व्यक्तिगत विषय असून त्यावर जाहीर बोलू नये, याचा फायदा भाजपाला होत आला आहे, असे रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, इतिहासात काय घडले, हे मला माहिती नाही. देव, धर्म हा वैयक्तिक विषय आहे. मी लहानपणापासून देवळात जातो, असे रोहित पवार म्हणाले. तत्पूर्वी, नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणे, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणे, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचे राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे! अशी भूमिका रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून व्यक्त केली होती. 
 

Web Title: ncp rohit pawar replied jitendra pawar criticism about lord rama objectionable statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.