Rohit Pawar : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चिघळला, मुंबईत कर्नाटकची जाहिरात; रोहित पवारांनी ट्विट केले 'ते' फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 12:55 PM2022-12-14T12:55:21+5:302022-12-14T13:06:17+5:30
NCP Rohit Pawar : महाराष्ट्र-कर्नाटकवरून राजकारण तापलेलं असताना आता मुंबईत बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमाप्रश्न चिघळला आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावमध्ये येणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्यांना इशारा दिला होता. बोम्मईंनी दिलेली धमकी धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar) हे बेळगावमध्ये दाखल झाले होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. मी बेळगावला जाऊ शकतो, तर मंत्री का जात नाहीत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. दोनवेळा सांगूनही मंत्री बेळगावला का गेले नाहीत? अशी विचारणा केली होती.
महाराष्ट्र-कर्नाटकवरून राजकारण तापलेलं असताना आता मुंबईत बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मराठी अस्मिता दुखावण्याचे व महाराष्ट्राला आव्हान देण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते" असं पवारांनी म्हटलं आहे. तसेच जाहिराती असलेल्या बसचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.
कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही, परंतु सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता तसेच सीमाप्रश्नावरून #मराठी अस्मिता दुखावण्याचे व महाराष्ट्राला आव्हान देण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते. आपल्या सरकारने विचार करायला हवा. pic.twitter.com/tvC3pQgyPz
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 14, 2022
"आपल्या सरकारने विचार करायला हवा"
"कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही, परंतु सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता तसेच सीमाप्रश्नावरून #मराठी अस्मिता दुखावण्याचे व महाराष्ट्राला आव्हान देण्याचे कर्नाटक सरकारचे धोरण बघता मुंबईत अशा जाहिराती बघितल्यावर नक्कीच खंत वाटते. आपल्या सरकारने विचार करायला हवा" असं रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. "बेळगावला मी व्यक्तिगत आणि एक नागरिक म्हणून गेलो. मी आताच नाही तर अनेक वेळा त्याठिकाणी गेलो असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार त्याठिकाणचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. संवेदनशील गोष्टीची काळजी घेण्याची आपली सर्वांची जबाबबदारी असल्याचेही ते म्हणाले.
राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन
राज ठाकरेंबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पवार यांनी खोचक शब्दात टिप्पणी केली. मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन असल्याचे ते म्हणाले. मात्र, आता ते कुठेतरी भाजपचा विचार घेऊन पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी आता स्वतःची ओरिजनल स्टाईल कायम ठेवावी. भाजप आपली राजकीय पोळी भाजून घेत असेल, तर त्याला आपण पाठिंबा का द्यायचा? राजकारण हे तात्पुरते असते, विचार हे दीर्घकालीन असतात, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"