Rohit Pawar : "महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 11:58 AM2023-10-31T11:58:00+5:302023-10-31T12:05:50+5:30

NCP Rohit Pawar Slams Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यावरूनच देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

NCP Rohit Pawar Slams Devendra Fadnavis Over Maratha Reservation | Rohit Pawar : "महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?"

Rohit Pawar : "महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?"

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी जाळपोळ, निदर्शने, आंदोलने पाहायला मिळत आहे. याच दरम्यान काही नेत्यांची घरं, कार्यालये यांना आग लावण्याचे प्रकार घडल्याचं दिसत आहेत. तर काही आमदार आणि खासदार पुढे येऊन राजीनामा देखील देत आहेत. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगडमधील रायपूरच्या भाजपा कार्यालयात बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यावरूनच देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षरीत्या पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का?" असा सवालही विचारला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच काही स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत. 

"आज सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र होरपळतोय... पण ही आग विझवण्याचं सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगड भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडं जातात...
कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासारख्या नेत्याला नक्कीच कळत असणार.. तरीही महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?
एकीकडे मनोज जरांगे पाटील शांततेचं आवाहन करत आहेत. पण गृहमंत्री असूनही महाराष्ट्र जळत असताना तुम्ही इतर राज्यात निघून जाता. याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षरीत्या पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का?" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेली जाळपोळ बंद करा, अन्यथा उद्या रात्री मला नाइलाजाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असावेत, असा अंदाज आहे. सत्ताधाऱ्यांचे असाल, नसाल तरीही जाळपोळ बंद करा, अशी सादही मनोज जरांगे पाटील यांनी घातली. तसेच, आंदोलन चिघळू नये यासाठी त्यांनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने आंदोलक हिंसक झाले. म्हणून, उपोषणकर्ते पाटील यांनी आजपासून पाणी पिण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

Web Title: NCP Rohit Pawar Slams Devendra Fadnavis Over Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.