Video - "सामान्य प्रवाशांची लालपरी सरकारच्या दुर्लक्षामुळे जलपरी झालीय"; रोहित पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 03:28 PM2023-08-25T15:28:30+5:302023-08-25T15:29:01+5:30
Rohit Pawar : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ग्रामीण भागातील रस्ते व त्यावर धावणाऱ्या लालपरीची स्थिती भयावह होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे काढणारे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीतील एका बसचे छत हवेत उडत असल्याचा प्रकार उजेडात आला होता. तर, त्यापूर्वी बसमधील छतावरून पावसाचे पाणी गळत असल्यामुळे प्रवासी सीटवर छत्री घेऊन बसून असल्याचा व्हिडीओदेखील समोर आला होता. तर, आता चक्क चालकच छत्री घेऊन दुसऱ्या हाताने बसचे स्टेअरिंग सांभाळताना दिसत आहे.
एसटी चालकाच्या एका हातात छत्री तर दुसऱ्या हाती चक्क प्रवाशांचे प्राणच असल्याचे यातून दिसून येते. हा व्हिडीओदेखील गडचिरोली जिल्ह्यातील असून यातून एसटी बसची स्थिती व प्रवाशांचे हाल 'बेहाल' असल्याचेच चित्र स्पष्ट होते. याच दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवरून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सामान्य प्रवाशांची लालपरी सरकारच्या दुर्लक्षामुळे जलपरी झालीय" असं खोचक टोला लगावला आहे.
राज्यभरात सामान्य प्रवाशाची #लाल_परी सरकारच्या दुर्लक्षामुळे #जलपरी झालीय. हे 'सामान्यांचं सरकार' आहे असं भासणाऱ्या सरकारला मात्र सामान्य माणसांविषयी काहीही देणंघेणं आणि #seriousness नसल्याचंच यातून सिद्ध होतं.. आता #मविआ आघाडी सरकारच्या काळात #st कर्मचाऱ्यांच्या नावे राजकारण… https://t.co/FH7OeY3rYO
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 25, 2023
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "राज्यभरात सामान्य प्रवाशाची #लाल_परी सरकारच्या दुर्लक्षामुळे #जलपरी झालीय. हे 'सामान्यांचं सरकार' आहे असं भासणाऱ्या सरकारला मात्र सामान्य माणसांविषयी काहीही देणंघेणं आणि #seriousness नसल्याचंच यातून सिद्ध होतं.. आता #मविआ आघाडी सरकारच्या काळात #st कर्मचाऱ्यांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना ही गळणारी बस दिसेल काय?" असं म्हणत रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.