Rohit Pawar : "रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 12:01 PM2022-12-07T12:01:00+5:302022-12-07T12:11:40+5:30
NCP Rohit Pawar : सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत आहे. महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांनी मंगळवारचा आपला दौरा रद्द केलेला असताना दुसरीकडे याच मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगाव येथे दाखल झाल्यामुळे प्रचंड पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सीमाभागातील टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावचे वातावरण तापलेले आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे.
"पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?" असं म्हणत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच "वैयक्तिक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?" असा सवाल देखील रोहित पवार यांनी विचारला आहे.
आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू... करू... केंद्राशी बोलू... ही मूळमुळीत भाषा कशासाठी? #कर्नाटक च्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 7, 2022
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत निशाणा साधला आहे. "आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू... करू... केंद्राशी बोलू... ही मूळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही!" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे. "जेव्हा राज्यकर्ते असता, तुम्ही सत्तेत असता. केंद्रात तुमची सत्ता आहे, कर्नाटकात तुमची सत्ता आहे, महाराष्ट्रात तुमचीच सत्ता आहे. अशावेळी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जर यापद्धतीचं राजकारण होत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही."
"शरद पवार जेव्हा ते करतील तेव्हा अख्खा महाराष्ट्रात कर्नाटकात दिसेल"
"शरद पवार जेव्हा बोललेत, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून ते बोललेत, यापूर्वी त्यांनी ते करुन दाखवलेलं आहे. पवारसाहेब बोलतात तेव्हा ते बोलण्यासाठी नाही तर करण्यासाठी असतं. महाराष्ट्राच्या सरकारने योग्य भूमिका घेतली नाही, तर पवारसाहेब जे बोललेत ते करतील. शरद पवार जेव्हा ते करतील तेव्हा अख्खा महाराष्ट्रात कर्नाटकात दिसेल" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने आपल्या राज्याची अस्मिता टिकवण्यासाठी योग्य ती भूमिका घेण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने योग्य ती भूमिका घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, असेही पवार यांनी म्हटले.
"महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरू पण घटनाबाह्य मुख्यमंत्री यावर गप्प का?"
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र या सगळ्यावर गप्प का?, स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत?" असा सवाल विचारला आहे. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री घाबरून तिथे गेलेच नाहीत. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"