Rohit Pawar :"महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला सांगण्यासाठी हे ट्वीट पुरेसं, पण दरवेळेस युवकांचा मोठा बळी का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 06:16 PM2022-09-14T18:16:50+5:302022-09-14T18:28:12+5:30
NCP Rohit Pawar : रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजीगुजरातल्या नेण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. परंतु आता यावर वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी यावर भाष्य केलं आहे.
"महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी हे ट्वीट पुरेसं, पण दरवेळेस महाराष्ट्राच्या युवकांचा एवढा मोठा बळी का?" असा सवाल विचारला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी @AnilAgarwal_Ved साहेबांचं हे ट्वीट पुरेसं आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरातच्या निवडणुका बघता पंतप्रधान साहेबांचं प्राधान्य नेहमीप्रमाणे गुजरात असेल यात काही शंका नाही, पण त्यासाठी दरवेळेस महाराष्ट्राच्या युवकांचा एवढा मोठा बळी का?" असं म्हटलं आहे.
महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी @AnilAgarwal_Ved साहेबांचं हे ट्वीट पुरेसं आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरातच्या निवडणुका बघता पंतप्रधान साहेबांचं प्राधान्य नेहमीप्रमाणे गुजरात असेल यात काही शंका नाही, पण त्यासाठी दरवेळेस महाराष्ट्राच्या युवकांचा एवढा मोठा बळी का? pic.twitter.com/I3AeB394qq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 14, 2022
"याप्रकरणी महाराष्ट्राचे नेते कमी पडले किंवा चुकले हे कोणीही नाकारू शकत नाही. IFSC बाबतही असंच घडलं होतं. किमान आता तरी गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. महाराष्ट्रातील युवा रोजगाराकडं डोळे लावून बसले असताना एवढी उदारता आपल्याला परवडणारी नाही" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खूश केले आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेऊन महाराष्ट्राचा मोठा अपमान या सरकारने केला असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
"लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले, मोदीजी व शहांना नक्कीच खूश केले"
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "वेदांत फॉक्सकॉन या प्रकल्पामुळे 26 हजार कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळणार होता, मात्र महाराष्ट्राची ही गुंतवणूक गुजरातकडे नेऊन महाराष्ट्राचा मोठा अपमान या सरकारने केला आहे" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. "वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटीची सवलत दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटीची! तरीही हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला. लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खूश केले आहे" असा खोचक टोला देखील अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.