Maharashtra Political Crisis: “हरल्याची मला खंत नाही, पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन”; रुपाली चाकणकरांचे उद्धव ठाकरेंना समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 03:15 PM2022-06-30T15:15:57+5:302022-06-30T15:16:34+5:30
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत, त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर आता शिंदे गट आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार राज्यात स्थापन होत आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. महाविकास आघाडीतील नेत्यांनी यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी कवितेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे.
रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले आहे. लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही… लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही… पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, अशा काही ओळी रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिल्या आहेत. याशिवाय रुपाली चाकणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.
तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल
महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली. होती. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरींच्या हालचालींबाबत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना तब्बल ४ वेळा क्लपना दिली होती, अशी माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंनी कोणत्याच हालचाली न केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राज्याच्या गुप्तचर विभागाने एक माहिती उघड केली आहे. या महितीकडे राज्य सरकारने गांभिर्याने पाहायला हवे होते, मात्र ते गांभीर्य राज्य सरकारने वेळीच ओळखले नाही असा एसआयडीचा हवाल सांगतोय. राज्यातल्या एसआयडीने म्हणजेच राज्य गुप्तचर विभागाने दोन महिन्यांआधीच राज्य सरकारला एकनाथ शिंदे यांच्या बंडाची जाणीव करुन दिली होती. दोन महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आठ ते दहा आमदार होते असा इशारा एसआयडीने दिला होता अशी माहिती समोर येत आहे.