पंतप्रधान मोदीजी, बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?; रूपाली चाकणकरांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:41 PM2021-05-07T12:41:55+5:302021-05-07T12:42:39+5:30
Petrol-Diesel Price Hike : निवडणुकांचे निकाल लागल्यापासून देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होत आहे सातत्यानं वाढ
नुकतेच पश्चिम बंगाल येथील निवडणुकांचे निकाल लागले. यामध्ये भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी तृणमूल काँग्रेसनं त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं. दरम्यान, निवडणुकांच्या निकालानंतर सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. यावरून " सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोलडिझेलवर का काढताय?," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
"दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं. काही नाही तर निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते. पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ. सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?," असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली.
देशात आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. शुक्रवारी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर २७ पैशांनी वाढून ९७.६१ रुपयांवर पोहोचले. तर डिझेलच्या दरात ३३ पैशांची वाढ झाली. मुंबईत डिझेलचे दर ८८.८२ रूपयांवर पोहोचले. तर दुसरीकडे दिल्लीमध्येही पेट्रोलचे दर २८ पैशांनी वाढून ९१.२७ रुपयांवर पोहोचले.