PM मोदींचे विधान, शरद पवारांकडून समाचार; म्हणाले, “माझे बोट धरुन राजकारणात आले असते तर...”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 10:30 AM2024-03-23T10:30:24+5:302024-03-23T10:30:32+5:30

NCP Sharad Pawar News: वसूल करायचे १०० रुपये, त्यातील ६ रुपये परत द्यायचे आणि सांगायचे की, तुमच्या खिशात मी पैसे टाकले. माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे. ही मोदी गॅरंटी कशी? असा सवाल शरद पवारांनी केला आहे.

ncp sharad pawar addressed sabha in baramati and criticised central govt and bjp and ajit pawar group | PM मोदींचे विधान, शरद पवारांकडून समाचार; म्हणाले, “माझे बोट धरुन राजकारणात आले असते तर...”

PM मोदींचे विधान, शरद पवारांकडून समाचार; म्हणाले, “माझे बोट धरुन राजकारणात आले असते तर...”

NCP Sharad Pawar News: ही निवडणूक अत्यंत  महत्त्वाची निवडणूक आहे. काही  लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार  आहे. पण एक अट आहे. मी तुम्हाला मत मागितले, तुम्ही मला मत दिले, तुम्ही  मला निवडून दिले आणि निवडून दिल्यानंतर मी जे मत ज्या नावाने, ज्या  पक्षाने, ज्या कार्यक्रमाने तुमच्याकडे मागितले, ते नाव, पक्ष, सगळे तुम्ही  विसरलात. मग तुम्ही लोकांची फसवणूक करता. ही फसवणूक होता कामा नये.  राजकारणामध्ये लोकांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे. लोकांचे भवितव्य हे  पाळले पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार गटाला अप्रत्यक्षरित्या जोरदार टोला लगावला.

बारामती येथील एका मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी ईडी कारवाईवरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला. आज सत्ता ही हुकूमशाहीच्या रस्त्याला आपण जातो, त्या पद्धतीने वापरली जाते.  तुम्हाला झारखंड नावाचे राज्य माहिती आहे का? आदिवासींचे राज्य आहे. मोदींविरुद्ध भूमिका घेतली. तिथल्या मुख्यमंत्र्याला  तुरुंगात टाकले. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. दिल्ली देशाची  राजधानी आहे. केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरूण मुख्यमंत्री झाला.  त्यांची शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातून व  बाहेरून लोक यायला लागले. चांगले राजकारणी आज तुरुंगात आहेत. कशासाठी, असे सवाल करत शरद पवार यांनी टीका केली.

शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो

दुर्दैवाने देशामध्ये जे काही घडते आहे, ते वेगळे आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. बारामतीला आले होते, तिथे भाषण केले, तेव्हा म्हणाले होते की, शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो. मात्र, पण आज त्यांचे जे काही राजकारण सुरू आहे. ते माझ्या विचारांनी नाही. माझे बोट धरल्यावर मी असले काम करू देणार नाही. मोदी सरकारने आखलेली धोरणे हिताची नाहीत. पंतप्रधान काय म्हणतात? पंतप्रधान कर बसवतात, वसूल करतात. त्या वसुलीतून १०० रुपये आले तर त्यातले ६ रुपये खिशात टाकतात आणि सांगतात की, तुमच्या खिशात मी पैसे टाकले. माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे. ही गॅरंटी  कशी? वसूल करायचे १०० आणि ६ परत द्यायचे. १०० वसूल करायची गॅरंटी हे आजचे पंतप्रधान म्हणतात. ही सामान्य माणसाच्या दृष्टीने योग्य गोष्ट नाही. हा  जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाच्या हिताचा नाही. जिथे हित नाही,  तिथे बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे, असे शरद पवार म्हणाले.

गेले ते गेले! आपण नवीन उभे करू

निवडणूकीत बटण दाबले पाहिजे. आता यावेळेची खूण ही वेगळी आहे.  घड्याळ्याची खूण ही तुम्हाला पाठ होती. पक्ष, घड्याळ, झेंडा  सगळ्याचीच चोरी झाली. बाकी किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली. सगळेच्या  सगळे सोडून गेले. आता सगळ्या देशाला माहीत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  कुणी स्थापन केला? हा पक्ष आपण स्थापन केला. जे घेऊन गेले, त्यांनी मागच्या  निवडणुकीमध्ये मते मागितली. ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या  नावाने, नेत्याच्या नावाने. झेंडा कोणता होता? तोच घड्याळाचा होता.  त्यामुळे हे सगळे घेऊन मंडळी गेली. त्यामुळे काही लोक नाराज झाले. मी  म्हटले नाराज व्हायचे नाही. गेले ते गेले! आपण नवीन उभे करू. हा अधिकार  लोकांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. नवीन पक्ष  काढू. काही नसताना पक्ष काढला, तर पक्ष नुसता काढला नाही तर राज्य  हातामध्ये घेतले. अनेकांना मंत्री केले, अनेकांना आमदार केले, अनेकांना  खासदार केले, अनेकांना केंद्राच्या मंत्रीमंडळात घेतले. नवनवीन धोरणे  घेतली, असे शरद पवारांनी सांगितले.

दरम्यान, एका दिवशी आपल्या घरात चोरी होते, म्हणून आपण घर चालवणे बंद  करतो का? पुन्हा एकदा उभे राहू, त्याच पध्दतीने आम्ही आज हा निकाल घेऊन नवा  पक्ष, नवी खूण, नवा झेंडा, कार्यक्रम जुना हा घेऊन पुढे आलेलो आहोत.  नेहमीची खूण आहे ती आता गेली, आता तुतारी आली. शिवछत्रपती ज्यावेळेला  संघर्षाने जातात त्यावेळेला सन्मानाने लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. पण विजय संपादन करून ज्यावेळेला शिवछत्रपती परत येतात त्यावेळेला दाराशी याच  तुतारीने त्यांचे स्वागत होते. आज महाराष्ट्रात झालेल्या बदलातून  महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाच्या परिवर्तनाची तुतारी वाजवायची  आहे. त्यासाठी ही खूण लक्षात ठेवली पाहिजे. आणि हे काम तुम्ही लोकांनी  करावे, असे आवाहन शरद पवारांनी केले.
 

Web Title: ncp sharad pawar addressed sabha in baramati and criticised central govt and bjp and ajit pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.