“मी ज्योतिषी नाही, पण लोकांची मानसिकता PM मोदींविरोधात दिसतेय”; शरद पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:51 AM2024-04-03T10:51:18+5:302024-04-03T10:51:28+5:30
Sharad Pawar News: जनता भाजपाला पराभूत करण्यास सक्षम उमेदवारालाच मतदान करेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी काहीच दिवस राहिले आहेत. पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी कामाला लागले असून, प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. यातच प्रकाश आंबेडकरांच्या खेळीने पुणे आणि बारामती येथील निवडणूक रंगतदार तसेच चुरशीची होऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. यातच देशातील लोकांची मानसिकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दिसत आहे, असा दावा शरद पवारांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघात उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे अलीकडेच भेट घेतलेल्या वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी दिली आहे. यातच मीडियाशी बोलताना शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य करताना, भाजपा आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.
लोकांची मानसिकता PM मोदींविरोधात दिसतेय
विरोधकांच्या इंडिया आघाडीचे जागावाटप आणि पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, मी ज्योतिषी नाही. याबाबत अजून विचार केला नाही. लोकांची मानसिकता बदलल्याचे आपण पाहत असून, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहे. सध्याच्या सरकारमध्ये संस्थांवर हल्ले होत आहेत, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीत आम्हाला प्रकाश आंबेडकर हवे आहेत, असे शरद पवार म्हणाले. तसेच जनता भाजपाला पराभूत करण्यास सक्षम उमेदवारालाच मतदान करेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.