कुणी सांगितलं मी म्हातारा झालोय, तुम्ही काय बघितलयं?; शरद पवारांचा मिश्किल टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 02:25 PM2022-10-24T14:25:57+5:302022-10-24T14:26:23+5:30
जो संकटात आहे त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायला हवा. अतिवृष्टीमुळे भू गर्भातील पाण्याची पातळी निदान २ वर्ष टिकेल. नुकसान झालंय त्याची भरपाई सरकारने करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं पवार म्हणाले.
पुरंदर - ज्यांच्या हातात देशाची, राज्याची सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी काही ठोस पाऊले टाकली पाहिजे ती टाकायची त्यांची तयारी नाही. निर्णय घ्यायला तयार नाहीत. १९७८ मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा खेड्यापाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा १५ दिवसांत मी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी आली तेव्हा ३ महिन्यात ७२ हजार कोटींचे शेतकरी कर्ज माफ केले होते असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले की, गेल्या १० वर्षात भू विकास बँकेचे कर्ज शेतकऱ्यांना मिळाले आहे का? कुणी वसूलीला जात नाही. जिथे वसूली होणार नाही तिथे भू विकास बँकेचे कर्ज माफ केले अशी घोषणा राज्य सरकारने २-३ दिवसांपूर्वी केली. संकटग्रस्त शेतकऱ्यांना नियम बाजूला ठेवून माणूस म्हणून मदत करायला हवी. जो संकटात आहे त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायला हवा. अतिवृष्टीमुळे भू गर्भातील पाण्याची पातळी निदान २ वर्ष टिकेल. नुकसान झालंय त्याची भरपाई सरकारने करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वेळ पडल्यास संघर्ष करू. मोर्चा काढायचा, मागणी करायची. जुने दिवस विसरायचे कारण नाही. पिकांचे जे नुकसान झालंय त्याची भरपाई केंद्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पुरंदर येथे शेतकरी संवाद कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
तसेच माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती. तेव्हा मी फळबाग योजना काढली. तेव्हा शेतकऱ्यांना मोठे आर्थिक सहाय्य केले. आंबे, काजू कोकणात हजारो शेतकरी उत्पादन घेतात. कोकणातला शेतकरी १६-१८ वय झाले तर मुंबईकडे कामाला जायचे. ६० वय झाल्यानंतर गावाकडे परतायचे. शेती फारसी नव्हती. आज मुंबईला जाण्याची भूमिका कोकणच्या लोकांची नाही. फळबाग योजनेचा फायदा घेत काजू, आंबा, फणस उत्पादन कसं घेता येईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. सरकारच्या योजना शेतकऱ्यांच्या पदरात कशा पडतील यासाठी प्रयत्न करू असंही शरद पवार म्हणाले.
मी म्हातारा झालोय का?
मी आता बाहेर फिरू नये असं एकानं सांगितले. पण कुणी सांगितले मी म्हातारा झालो, तुम्ही काय बघितलंय? मी म्हातारा झालो नाही. वय वाढते. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका आमची आहे. १९८४ ला मी लोकसभेला पहिल्यांदा उभा होतो तेव्हापासून सुप्रिया सुळे, अजित दादा, संजय जगतापांची निवडणूक असेल प्रत्येक वेळी सासवडच्या लोकांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे असं शरद पवारांनी म्हटलं.
सन्मानाने जगण्याची भूमिका तालुक्याने घेतली
सोमेश्वर कारखाना सर्वात जास्त भाव ऊसाला देतो. १६ लाख टन ऊस गाळप केला जातो. रोजगार हमी काम सुरू करा, दुष्काळाचं काम सुरू करा अशा मागण्या होत होत्या. आता दिवस बदलले. कारखाने हवेत अशी मागणी होतेय. काहीजण काम करण्यापेक्षा प्रश्न उपस्थित करायचं काम करतात. महाराष्ट्राच्या कुठल्याही एसटी स्टँडवर गेलो तरी कानिफनाथ रसवंती गृह दिसायचं. गाव कुठलं तर पुरंदर, या भागातील लोकांनी ते ताब्यात घेतले होते. दिवेघाटातून खाली उतरल्यावर अमृततुल्य चहा हेदेखील पुरंदर तालुक्यातून पुढे आले. सन्मानाने जगण्याची भूमिका या तालुक्यातील लोकांनी घेतली असं पवार म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"