“वडिलांचे प्रामाणिकपणे काम, मुलात ५ टक्केही निष्ठा नाही”; शरद पवारांची वळसे पाटलांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:18 PM2024-02-21T22:18:16+5:302024-02-21T22:20:25+5:30

NCP Sharad Pawar News: एका जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांनी भाजपा, केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्यासह अशोक चव्हाण आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

ncp sharad pawar criticizes bjp govt and ashok chavan dilip walse patil in rally | “वडिलांचे प्रामाणिकपणे काम, मुलात ५ टक्केही निष्ठा नाही”; शरद पवारांची वळसे पाटलांवर टीका

“वडिलांचे प्रामाणिकपणे काम, मुलात ५ टक्केही निष्ठा नाही”; शरद पवारांची वळसे पाटलांवर टीका

NCP Sharad Pawar News: शिवसेना ठाकरे गटाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गट राज्यसभात सभा घेताना दिसत आहे. “महासभा एकजुटीची, साथ  अनुभवाची ताकद महाराष्ट्राची” या सभेतून शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. एक  वेगळा काळ आहे. देशामध्ये वेगळे चित्र आहे. शेतीची इमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थ आणि  संकटात आहे. पिकाची किंमत शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. खर्च अधिक लाभ, उत्पन्न कमी ही स्थिती  झाली तर कर्जबाजारी होतो. कर्ज डोक्यावर एवढे बसते की,  घरातली भांडी-कुंडीही काढण्याची भूमिका सावकार किंवा बँका येऊन सुद्धा  घेतात. ही स्थिती पाहिल्यानंतर सन्मानाने जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे  तो कधीकधी आत्महत्या करायला जातो. हे चित्र आज देशामध्ये आहे, या शब्दांत शरद पवार यांनी टीका केली.

टेलिव्हिजन असो किंवा वर्तमानपत्र असो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोज एक जाहिरात असते की, मी तुम्हाला गॅरंटी देतो. मोदीची  गॅरंटी, कसली? तर तुम्हाला शेतमालाची किंमत चांगली मिळेल. तुमच्या  मुलांना नोकरी मिळेल. तुमचा माल जगाच्या बाजार समितीत जाईल. त्याची किंमत  चांगलीच तुम्हाला मिळेल. ही गॅरंटी मोदी देतात. एका बाजूला यांची गॅरेंटी  आणि दुसऱ्या बाजूने दर दिवसाला कोणी ना कोणीतरी आत्महत्या करत आहे. हे  चित्र या देशामध्ये पाहायला मिळत आहे आणि म्हणून ही स्थिती किती दिवस चालू  द्यायची? यात बदल करायचा की नाही? जर ठरवले तर आपण करू शकतो, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

मोदी यांना पक्ष फोडणे, विरोधकांना तुरुंगात टाकणे यातच आस्था

तुम्ही लोकांनी मला देशामध्ये शेतीची जबाबदारी १० वर्षांसाठी  दिली. १० वर्षानंतर, ज्यावेळी  शेती खात्याचे काम माझे संपले आणि त्या खात्यातून बाहेर आलो, त्याचवेळी  हा देश जगातील २ नंबरचा गहू तयार करणारा देश झाला. १ नंबरचा तांदूळ तयार  करणारा देश झाला. आता या सर्वाची गरज आहे. पण, मोदी साहेबांना यासंबंधीची  आस्था नाही. त्यांना आस्था कशात आहे तर, पक्ष फोडणे, विरोधकांना तुरुंगात  टाकणे, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला. तसेच पंतप्रधान कुठे-कुठे काय-काय बोलतात. महाराष्ट्राचे एकेकाळी  मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण, त्यांच्याबद्दल पंतप्रधान यांनी  कुठेतरी जाहीर भाष्य केले. परिणाम काय झाला तर, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी अशोक  चव्हाण गेले. ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले ते विसरून ते  भाजपात जाऊन बसले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या दमदाटीने तसेच पक्ष  फोडणे, माणसे फोडणे, ते जर आपल्या पक्षात आले नाही, तर दमदाटी करून  त्यांच्यावर बेकायदेशीररित्या कारवाई केली जात आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली. 

दरम्यान, अनेक लोकांनी माझ्याबरोबर प्रामाणिकपणाने काम केले. माझ्याबरोबर काम करणारे दत्तात्रय वळसे पाटील होते. या लोकांचे वैशिष्ट्य असे होते की, निष्ठा होती त्यांच्याकडे; निष्ठेवर त्यांनी कायम  काम केले. आम्हाला  साथ दिली आणि आज काय बघतोय आम्ही? ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. दत्तू पाटलांचा वारसा आहे. त्यांनी काय केले? त्यांना आम्ही काय कमी दिले? विधानसभा दिली. अनेक मंत्रिपद दिले. विधानसभेचे अध्यक्षपद दिले. देशाच्या साखर उद्योगांचे सबंध हिंदुस्तानचे पद दिले. अशा अनेक गोष्टी दिल्या. प्रतिष्ठा दिली आणि हे दिल्यानंतर सुद्धा दत्तू पाटलांमध्ये जी निष्ठा  होती, त्याच्या ५ टक्के सुद्धा त्यांच्यात नाही. आज निघून जाण्यासंबंधी भूमिका या नेतृत्वाने घेतली. जे निष्ठेने आम्हा लोकांच्या निष्ठेला  साथ देत नसतील, ते सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांची निष्ठा ठेवणार नाहीत. ही भूमिका आपल्या सर्वांना लक्षात ठेवावी लागेल आणि हे चित्र  बदलायचे असेल, तर आपल्याला जागे व्हावे लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

 

Web Title: ncp sharad pawar criticizes bjp govt and ashok chavan dilip walse patil in rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.