त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:15 AM2024-05-22T10:15:07+5:302024-05-22T10:18:39+5:30
Nilesh Lanke: लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, अशी टीका निलेश लंके यांनी केली आहे.
Nilesh Lanke: लोकसभेच्या काही टप्प्यांचे मतदान होणे अद्याप बाकी आहे. २० मे रोजी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण झाले. आता ४ जून रोजी संपूर्ण देशभरात एकाच दिवशी मतमोजणी होणार आहे. जनतेचा कौल कोणाला आहे, हे कळणार आहे. तोपर्यंत ईव्हीएम मशीन कडेकोट सुरक्षा यंत्रणेत ठेवण्यात आली आहेत. परंतु, काही ठिकाणी ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आली आहे, तेथी सुरक्षा व्यवस्था योग्य नसल्याचे दावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून, ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही फुटेज दाखवणारा मॉनिटर बंद पडला होता. तब्बल अर्धा तास हे सीसीटीव्ही फुटेज दिसत नव्हते. त्यामुळे रोहित पवार आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, काहीवेळानंतर हे सीसीटीव्ही फुटेज पुन्हा मॉनिटरवर दिसू लागले होते. मात्र, या अर्धा तासात कोणीही स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम यंत्रांशी छेडछाड करु शकतो, असा आरोप विरोधकांनी केला होता. यानंतर आता निलेश लंके यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी अज्ञात इसमाचा वावर असल्याचा दावा केला आहे.
त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही?
निलेश लंके यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये, संरक्षण व्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आला. आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खात आहे. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, असे निलेश लंके यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामा पर्यंत आलाय.
— Nilesh Lanke - निलेश लंके (@Nilesh_LankeMLA) May 22, 2024
काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला.… pic.twitter.com/I0tZqYJpEI
दरम्यान, ईव्हीएम यंत्रांच्या सुरक्षेविषयी विरोधकांकडून वारंवार सवाल उपस्थित केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले. तसेच महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान झाले आहे. निकाल लागेपर्यंत ईव्हीएम मशीन्स या एका गोदामात ठेवल्या जातात. ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी तसेच स्ट्राँग रुमला कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.