“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 07:55 PM2024-06-15T19:55:31+5:302024-06-15T19:57:28+5:30

NCP Sharad Pawar Group News: मणिपूर हिंसाचार आणि पंतप्रधान मोदी यांचा परदेश दौरा यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने टीका केली आहे.

ncp sharad pawar group criticizes pm narendra modi on g7 summit and manipur violence | “इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल

“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल

NCP Sharad Pawar Group News: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी या परिषदेच्या सर्व कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी, 'मेलोडी टीमकडून हॅलो', असे म्हटले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाने अधिकृत एक्स हँडलवरून एक पोस्ट शेअर करत, पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते पहिल्यांदा इटलीच्या दौऱ्यावर गेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तेथे कायम तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला आहे. यावरूनही विरोधक केंद्र सरकार आणि भाजपावर निशाणा साधत आहेत. मणिपूर हिंसाचार आणि पंतप्रधान मोदी यांचा परदेश दौरा यावरून राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 

हीच आहे का मोदींची गॅरंटी?

मणिपूरमध्ये गेल्या १३ महिन्यांपासून हिंसाचार कायम असून जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. परंतु निवडणुकीपूर्वी, निवडणुकांच्या दरम्यान आणि निवडणुकीनंतर एकदाही मोदींना मणिपूरमध्ये जावेसे वाटले नाही. याउलट परदेश दौरे करण्यातच मोदीजी रमले आहेत. मणिपूरवासियांना वाऱ्यावर सोडण्याची हीच आहे का मोदींची गॅरंटी?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला आहे. 

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय चर्चेबाबत एक निवेदन जारी केले आहे. या द्विपक्षीय चर्चेवेळी दोघांनी भारत आणि इटलीमधील धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावाही घेतला. उभय नेत्यांनी स्वच्छ ऊर्जा, उत्पादन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दूरसंचार, एआय आणि खनिजांच्या क्षेत्रातील संबंध मजबूत करण्यावर सहमती दर्शवली. तसेच, या चर्चेवेळी नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या महायुद्धात इटलीच्या मोहिमेतील भारतीय लष्कराचे योगदान मान्य केल्याबद्दल इटली सरकारचे आभार मानले. भारत सरकार इटलीतील मॉन्टोन येथे यशवंत घाडगे (दुसऱ्या महायुद्धातील शहीद योद्धे) यांचे स्मारक विकसित करणार असल्याचे जाहीर केले. 
 

Web Title: ncp sharad pawar group criticizes pm narendra modi on g7 summit and manipur violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.