शरद पवार भाजपसोबत गेले नाही, त्याचे दुःख कुणाला झाले तर काय करणार; पाटलांचा पटेलांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 03:54 PM2023-12-01T15:54:12+5:302023-12-01T15:59:12+5:30

Jayant Patil Replied Praful Patel: चिंतन शिबिरात चिंतन करायचे असते, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

ncp sharad pawar group jayant patil replied ajit pawar group praful patel criticism | शरद पवार भाजपसोबत गेले नाही, त्याचे दुःख कुणाला झाले तर काय करणार; पाटलांचा पटेलांवर पलटवार

शरद पवार भाजपसोबत गेले नाही, त्याचे दुःख कुणाला झाले तर काय करणार; पाटलांचा पटेलांवर पलटवार

Jayant Patil Replied Praful Patel:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले असून, दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबिर झाले. या चिंतन शिबिरात खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार गटावर आरोप करताना अनेक दावे केले आहेत. याला शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. 

भाजप आणि शिवसेनेबरोबर २००४ मध्येच युती होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा जन्माला आला होता. त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांचा १६-१६-१६ असा फॉर्म्युला ठरला होता. भाजप-शिवसेनेबरोबर युतीत लोकसभा निवडणूक लढायची आणि सरकारमध्ये सामील व्हायचे असे ठरलं होतं. यासाठी माझ्या दिल्लीतल्या घरात दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांची चर्चा झाली होती. ही चर्चा आपण कोणाच्या सांगण्यावरून केली माहितीय का? अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंह या तिघांच्या सूचनेप्रमाणे बैठक झाली. प्रमोद महाजन यांना त्यांचे दिल्लीतील महत्त्व कमी होईल अस वाटल्याने ही युती नको होती, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. मीडियाशी बोलताना जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

शरद पवार भाजपसोबत गेले नाही, त्याचे दुःख कुणाला झाले तर काय करणार

मी त्यावेळी लहान होतो. मला तपशील माहिती नाही.ते म्हणतात २००४ ला भाजपबरोबर जाणार होते, पण तेव्हा ते गेले का? घटना काय घडली यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जर शरद पवारांना भाजपबरोबर जायचे असते, तर ते यापूर्वीच गेले असते. ते भाजपबरोबर गेले नाहीत ही वस्तूस्थिती आहे. त्याचे दुःख कुणाला असेल, तर माझा त्याला नाईलाज आहे. चिंतन शिबिरात चिंतन करायचे असते, असा टोला लगावताना चिंतनात ते काही बोलले असतील. मला तपशीलात ते काय बोलले माहिती नाही. त्याबाबत काही मत व्यक्त करायचे असेल, तर ते पूर्ण काय बोलले ते ऐकूनच मी बोलेन, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, माझ्या घरी झालेल्या बैठकीनंतर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे खुश होते. परंतु, त्यांना या सगळ्या घडामोडींमध्ये फारसे सहभागी करून घेतले नव्हते. प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांना बैठकीची बातमी सांगितली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर, शरद पवारांवर आडवी तिडवी टीका केली आणि २००४ ला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीची होणारी युती फिस्कटली. हे कोणालाही माहिती नसेल. हे आज पहिल्यांदाच जाहीरपणे सांगतो, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. 
 

Web Title: ncp sharad pawar group jayant patil replied ajit pawar group praful patel criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.