“सुप्रिया सुळेच बारामतीतून आगामी लोकसभा निवडणूक लढवतील”; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 09:50 PM2023-09-24T21:50:59+5:302023-09-24T21:52:26+5:30
NCP Jayant Patil-Supriya Sule: महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष एकत्र येऊन कोण कोठून निवडणूक लढविणार हे ठरवतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
NCP Jayant Patil-Supriya Sule: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या तयारीला आता वेग आला आहे. अनेकविध गोष्टींचा आढावा घेतला जात आहे. तिकिटवाटपाबाबत अद्याप हालचाली सुरू झाल्या नसल्या तरी यासंदर्भात काही कयास बांधले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष यांनी बारामतीलोकसभा मतदारसंघाबाबत मोठे विधान केले आहे. सुप्रिया सुळेच बारामतीतून आगामी लोकसभा निवडणूक लढवतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, हे सांगता येणार नाही. माझ्या पक्षाच्या उमेदवाराबाबत सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळेच आगामी लोकसभा निवडणूक बारामतीमधून लढवतील. मात्र, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र येऊन कोण कोठून निवडणूक लढविणार हे ठरवतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. काही मानाच्या तसेच प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत भाष्य केले.
गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीत गैर काहीच नाही
संसदेचे अधिवेशन असताना अनेक खासदार एकत्र भेटतात. छायाचित्र काढतात. पटेल यांनीही काढले असेल. उद्योगपती अदानी यांनी नवी उद्योग सुरू केला आहे. त्याच्या उद्घाटनाला पवार गेले, यात गैर काही नाही. अदानी यांना नवा प्रकल्प पवार यांना दाखवायचा असेल. भाजप विरोधातील इंडिया आघाडीत पवार महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणी शंका घेण्याची गरज नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, दुष्काळाबाबतची सरकारची घोषणा हवेतच राहिली आहे. सरकारकडून कोणतीही बैठक झालेली नाही. सरकार भूमिका घेत नाही. ते निवडणुकीत गुंतले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना गणेश मंडळांना भेट देण्यासाठी वेळ आहे, मात्र बैठक घेण्यासाठी नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान, भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार यांचे बॅनर काही ठिकाणी लागेल. याबाबत बोलताना, लोकशाहीत कोणी कोणाचा फलक लावू शकतो. समर्थक कोणाला कुठेही बसवितात. पक्षाकडे अनेक असे नेते आहेत जे मुख्यमंत्री होण्याच्या ताकदीचे आहेत. त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लागतात, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.