“माझा प्रामाणिकपणा ही सर्वांत मोठी ताकद, भ्रष्टाचाराविरोधात लढणार”; सुप्रिया सुळेंचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 04:41 PM2024-02-15T16:41:47+5:302024-02-15T16:44:31+5:30
NCP Sharad Pawar Group MP Supriya Sule News: पेटीएममध्ये सर्वांत मोठा २७ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
NCP Sharad Pawar Group MP Supriya Sule News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यातच दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना, माझा प्रामाणिकपणा हीच माझी सर्वांत मोठी ताकद आहे. भ्रष्टाचाराविरोधात आता लढणार आहे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवला.
देशातला सर्वांत मोठा भ्रष्टाचार हा पेटीएममध्ये झाला आहे. हे केंद्र सरकारच म्हणत आहे. नोटबंदी करण्यात आली. सगळ्या नोटा गेल्या असा दावा केला जातो. मग तुम्ही धाड टाकता तेव्हा हे पैसे कोठून येतात. देशातील पैसे कोणीतरी वेगळेच छापत आहे का? पेटीएममधील हा भ्रष्टाचार २७ हजार कोटी रुपयांचा आहे. हे माझे मत नाही. या बातम्या वर्तमानपत्रांत वाचल्या. याच पेटीएममध्ये चीनकडून गुंतवणूक करण्यात आली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
माझा प्रामाणिकपणा ही सर्वांत मोठी ताकद
भ्रष्टाचाराविरोधात लढायचे ठरवले आहे. माझी सर्वांत मोठी ताकद ही माझा प्रामाणिकपणा आहे. मला त्यांची भीती वाटत नाही. संसदेत पूर्ण ताकदीने लढते. खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही सर्वजण संसदेत आमची बाजू मांडतो. आम्हाला आयकर विभाग, ईडी, सीबीआयची भीती नाही. पेटीएममधील भ्रष्टाचाराचे २७ हजार कोटी कोणाचे आहेत, हे भाजपाने सांगितले पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना केली.
दरम्यान, आठ वर्षांपूर्वी निवडणूक रोख्यांना विरोध केला होता. भाजपाने आमच्यावर तेव्हा भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार मानते. न्यायालयाने निवडणूक रोख्यांवर बंदी घातली आहे. सर्वांत जास्त निवडणूक रोखे हे भाजपाकडे आहेत. निवडणूक रोख्यांचा विषय फार महत्त्वाचा आहे. या निवडणूक रोख्यांचा तपास झाला पाहिजे. यात भ्रष्टाचार झालेला असू शकतो, असे सर्वोच्च न्यायालयच म्हणत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.