बारामतीत ‘वंचित’ची साथ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संविधान जतनासाठी एकत्र काम करु”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 09:58 AM2024-04-03T09:58:37+5:302024-04-03T09:59:04+5:30
Supriya Sule News: वंचित बहुजन आघाडीने बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्याने आता ही निवडणूक अधिक चुरशीची होईल, असे सांगितले जात आहे.
Supriya Sule News: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची तयारी हळूहळू अधिक रंगतदार होऊ लागली आहे. उमेदवारी यादी जाहीर होत असून, त्यामुळे आता चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी चर्चेची दारे उघडी ठेवली असली तरी वंचित बहुजन आघाडी एकामागून एक उमेदवार जाहीर करत आहे. राज्यासह अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
वंचित बहुजन आघाडीनेबारामती मतदारसंघात उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे अलीकडेच भेट घेतलेल्या वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत २४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर करताच सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आभार मानले आहेत.
आपण सदैव एकत्रित काम करु ही ग्वाही देते
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात की, बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहिर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करु ही ग्वाही देते. पुन्हा एकदा धन्यवाद, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या खेळीमुळे बारामतीमधील लढत आणखीनच चुरशीची होणार आहे. विद्यमान खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये निवडणूक लढवणार आहेत. तर, महायुतीतून विजय शिवतारे यांचे बंड थंड झाल्याने अजित पवारांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. एकूणच रणधुमाळीत बारामतीकर कोणत्या पवारांच्या बाजूने कौल देतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.