Maharashtra Political Crisis: शरद पवार ठाकरेंच्या मदतीला सरसावले? शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदेंना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 05:54 PM2022-09-03T17:54:01+5:302022-09-03T17:56:46+5:30
Maharashtra Political Crisis: मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis: गेल्या अनेक दिवसांपासून शिवतीर्थावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी केल्यानंतर मोठे भगदाड शिवसेनेला पडले आहे. मात्र, आम्हीच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यातच शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा सुरू आहे. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या वादात मनसेने उडी घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मदतीला सरसावले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचक सल्लाही दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण वाद टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
शिवाजी पार्क मैदानावरून वाद घालू नये
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे गट आणि शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावरून वाद न घालण्याचे आाहन केले आहे. शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेपासून मेळावे घेत आले आहेत. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावर मेळावे घेत आहेत. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे नेतृत्व करतील असे बाळासाहेबांनी सांगितले होते. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावरून वाद घालू नये, असे अजित पवार म्हणाले. ज्यांच्या हातात पॉवर आहे ते पाहिजे तशा गोष्टी करतात. आधी एकाचा आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. वाद घालू नका. शिवाजी पार्क मैदानावरील सभा झाल्यानंतरच जनता कोणाच्या पाठीशी आहे हे कळेल, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.
दरम्यान, भाजपने शिवसेनेचा गड असलेल्या वरळीतील जांबोरी मैदानावर आपला दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा केल्यानंतर आता शिवसेनेला चितपट करण्यासाठी शिंदे गट सरसावल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेची शान असलेल्या दसरा मेळाव्यात खोडा घालण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे.