“देवेंद्र फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील, अज्ञानामुळे ते विधान”; शरद पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 01:02 PM2023-06-26T13:02:16+5:302023-06-26T13:02:57+5:30
Sharad Pawar Vs Devendra Fadnavis: त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहिती नसेल, असे सांगत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
Sharad Pawar Vs Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेकविध घडामोडींवरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील. अज्ञानामुळे असे विधान केले असेल, यावर अधिक भाष्य करायची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडवणीस यांनी १९७७ मधील घडामोडींचा संदर्भ देताना, शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपबरोबर सरकार स्थापन केले. ते सरकार दोन वर्षं चालले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केले नसते तर ते सरकार पाच वर्षं चालले असते. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केले ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केले तर गद्दारी? असे कसे चालेल? असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील
यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी बेईमानी कधी केली हे त्यांनी सांगावे. १९७७ साली आम्ही सरकार बनवले. पण त्यात भाजप माझ्यासोबत होता. त्यामुळे त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहिती नसेल. त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवले ते सगळ्यांना घेऊन केले. त्यात त्यावेळचा जनसंघ, त्याचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते, आणखी काही सदस्य होते. मला वाटते ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील त्यामुळे त्यांना त्या काळातील माहिती नसेल. त्यामुळे ते अज्ञानापोटी अशी स्टेटमेंट करतात यापेक्षा जास्त काही भाष्य करायची गरज नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बैठकीची गरज काय होती. पण मुंबईमध्ये मित्र पक्षांची बैठक भाजप घेणार असल्याची बातमी वाचण्यात आली. मग तुम्हाला बैठका घेता येतात इतरांनी घेतल्या तर त्यात चुकीचे काय. मॅच्युअर पॉलिटीक्सची कमतरता आहे, एवढेच मी याबाबत म्हणू शकेल, असे शरद पवार म्हणाले.