“माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ”; मणिपूर घटनेवरुन शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 07:14 PM2023-07-20T19:14:36+5:302023-07-20T19:17:14+5:30

NCP Sharad Pawar Manipur Violence: मणिपूरमधील लोकांना न्याय मिळावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

ncp sharad pawar slams bjp and pm modi govt over manipur violence | “माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ”; मणिपूर घटनेवरुन शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

“माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ”; मणिपूर घटनेवरुन शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

googlenewsNext

NCP Sharad Pawar Manipur Violence: मणिपूर हिंसाचार प्रकरणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून फिरवले. संबंधित महिलांवर सामूहिक बलात्कारही करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्य आणि केंद्र सरकारला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यातच विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

शरद पवार यांनी एक ट्विट केले असून, यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वाक्याचा आधार घेत मणिपूर हिंसाचार आणि घडलेल्या सदर घटनेबाबत केंद्रातील मोदी सरकारला चांगलेच सुनावले आहे. शरद पवार यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. शरद पवारांनी केंद्र सरकारच्या मणिपूर धोरणांवर टीका केली आहे. 

माणुसकी नसेल तर तुमचा गौरव, कीर्ती व्यर्थ

माणुसकी नसेल तर तुमची कीर्ती व्यर्थ ठरते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मणिपूरमध्ये महिलांविरोधात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे अस्वस्थ वाटत आहे. अशा वेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन मणिपूरमधील लोकांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला पाहिजे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाने यावर तातडीने पाऊले उचलून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. 

दरम्यान, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना पंतप्रधान त्या ठिकाणी जात नाहीत, पण अमेरिकेचा दौरा करतात असे सांगत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे शरद पवार म्हणाले होते. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून शरद पवार या हिंसाचारावर सातत्याने आवाज उठवत असल्याचे बोलले जात आहे. 


 

Web Title: ncp sharad pawar slams bjp and pm modi govt over manipur violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.