Sharad Pawar : "राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर कशी काय घराणेशाही झाली?"; पवारांचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 06:49 PM2024-01-13T18:49:28+5:302024-01-13T19:03:35+5:30
NCP Sharad Pawar : शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच घराणेशाहीवरून थेट सवाल देखील विचारला आहे. "घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो, मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं" असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधित सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नव्हत्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील मात्र त्याकडे कुठलेही लक्ष देण्यात आले नाही. देशातील प्रत्येक शेतकरी सध्या संकटात आहे मात्र तरीदेखील केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसंदर्भात कुठलेही ठोस निर्णय घेण्यात येत नाही आहे."
"आज इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीचे नेतृत्व मल्लिकार्जुन खरगे यांनी स्विकारावं अशी सूचना काही सहकार्यांनी केली त्याला अनेकांनी संमती देखील दिली. त्याचप्रमाणे संयोजक म्हणून नितीश कुमारांनी जबाबदारी घ्यावी अशी सूचना करण्यात आली होती. परंतु संयोजक पदाची गरज नसल्याचं मत नितीश कुमारांनी मांडलं. त्यामुळे संयोजक पदाची नियुक्ती करण्यात आली नाही. एकविचाराने निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार" असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
"आज झालेल्या बैठकीमध्ये एकत्रित सभा घेण्यासाठी एक कमिटी स्थापन व्हावी अशा सूचना देखील अनेकांनी मांडल्या. आज देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष सत्ताधा-यांच्या विरोध एकत्र येत आहेत. हीच इंडिया आघाडी जमेची बाजू आहे. मी तुम्हाला १९७७ चं उदाहरण देईन. १९७७ च्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा आधीच घोषित केला नव्हता. निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीत ज्या पक्षाची लोकांनी निवड केली त्या पक्षाने मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली."
"निवडणुकीला सामोरे जाताना कोणाचीही निवड केली नव्हती किंवा मोरारजी देसाईंचा चेहरा प्रोजेक्ट केला नव्हता. तरीदेखील तेव्हा आम्ही निवडणूक जिंकलो. कारण तेव्हा लोकांमध्ये आणीबाणीविरोधात तीव्र भावना होत्या. त्या लक्षात घेऊन आम्ही मतं मागितली आणि लोकांनी मतं दिली. परिणामी आम्हाला कोणालाही प्रोजेक्ट करावं लागलं नाही. तशीच परिस्थिती आत्तादेखील आहे. आम्हाला कोणालाही प्रोजेक्ट करण्याची आवश्यकता नाही."
"अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही पण मी जाणार. मात्र २२ जानेवारीला नाही जाणार नंतर नक्की जाईन. श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसेच अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेला नाही तर त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणे चुकीचे राहील" असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.