“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 05:14 PM2024-09-23T17:14:06+5:302024-09-23T17:14:53+5:30
Sharad Pawar News: इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यासह पुढील पिढीने देशासाठी दिलेले योगदान कधी विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar News: ज्यांच्या हाती सत्ता आहे. त्या सत्तेचा गैरवापर केला जातो. तुमच्या मूळ प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही. या देशात परिवर्तनाची गरज आहे. ती गरज तुम्ही काही प्रमाणात भागवली. लोकसभा निवडणुकीत मोदी ४०० पार सांगत होते. त्याखाली येत नव्हते. ही भाषा बोलत होते. त्यांना भारताच्या जनतेने २४० जागा दिल्या. चंद्राबाबू, नितीश कुमार या दोन मुख्यमंत्र्यांची मदत झाली नसती तर दिल्लीतील मोदींचे सरकार तयार झाले नसते. पण तरीही यातून काही शिकले पाहिजे. त्या प्रकारची भूमिका घेतली जात नाही, असे शरद पवार यांनी एका सभेत सांगितले.
मुस्लिम समाजाबद्दल भाजपा व त्यांचे नेते चुकीचे वक्तव्य करत आहेत. सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आहे. आता त्यांची जागा त्याला दाखवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही. काँग्रेसवर मोदी टीका करत आहेत. काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी हिंदुस्तानसाठी दिलेले योगदान मोठे आहे. इंदिरा गांधी या सगळ्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
समुद्राच्या वाऱ्यावर सुद्धा पैसे खाल्ले जातात
त्याच्या हातात सत्ता आहे, तसा गैरवापर केला जात आहे. समुद्राच्या वाऱ्यावर सुद्धा पैसे खाल्ले जातात. माझी एक सवय आहे, मी वेळ असेल तर शक्यतो गाडीनेच प्रवास करतो. त्यामुळे आपल्याला रस्ते कसे आहेत ते कळतात. चिपळूण ते कराड या रस्त्याची दुरावस्था पहिली, तेव्हा लोकांना विचारले हे रस्ते इतके खराब कसे, तेव्हा कळले की हा रस्ते तीन वेळा दुरुस्त झाला. म्हणजेच यातून किती भ्रष्टाचार करावा लागतो हे यातून दिसते आहे, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान म्हणतात, गांधी कुटुंबाने देशाला लुटले. काय वाटले पाहिजे बोलायला. राजीव गांधी देशासाठी सर्व दिले. त्यांची पत्नी सोनिया गांधी त्यांच्याबद्दल आम्ही राजकीय भूमिका घेतली. पण सोनिया गांधींनी परदेशात जाण्याचा विचार केला नाही. त्यांनी देशाची बांधिलकी ठेवली. त्या आणि त्यांची पिढी देशाच्या भल्याचा विचार करतात. देशाबाबत आस्था दाखवतात. असे असताना पंतप्रधान भ्रष्टाचाराची पिढी म्हणतात. माझ्यासारख्यांना आश्चर्य वाटते. देशाचा पंतप्रधान या पद्धतीने कसे बोलू शकतात, असे सांगत शरद पवार यांनी हल्लाबोल केला.