“धनंजय मुंडेंना रात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट का घ्यावी लागली?”; बजरंग सोनावणेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 05:28 PM2024-09-13T17:28:31+5:302024-09-13T17:29:59+5:30

NCP SP Group Bajrang Sonawane News: लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लावण्यास बीड जिल्ह्यातील जनता उत्सुक आहे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.

ncp sp group bajrang sonawane asked that why did dhananjay munde have to go and meet manoj jarange at night | “धनंजय मुंडेंना रात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट का घ्यावी लागली?”; बजरंग सोनावणेंचा सवाल

“धनंजय मुंडेंना रात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट का घ्यावी लागली?”; बजरंग सोनावणेंचा सवाल

NCP SP Group Bajrang Sonawane News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात येताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच मराठा आरक्षणाच्या विषयावरून मनोज जरांगे यांनी आमदार पाडण्याची भाषा केली आहे. यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणे यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना थेट सवाल केला आहे. 

राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीने चांगलेच झोडपून काढले. शेतकरी बांधवांना यामुळे मोठा फटका सहन करावा लागला. मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली होती आणि तिथूनच धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली होती. धनंजय मुंडे यांनी रात्री जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. यावरून बजरंग सोनावणे यांनी काही प्रश्न उपस्थित केले.

धनंजय मुंडेंना रात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट का घ्यावी लागली?

धनंजय मुंडे यांना रात्री का भेटी घ्याव्या लागत आहेत? आता त्यांनी मनोज जरांगे यांची भेट का घेतली? हे मलाही समजले नाही, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनावणे यांनी दिली. तसेच राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी काम करायला पाहिजे. धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले होते की, आम्ही ‘एनडीआरएफ’चे निकष मोडून सर्व शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत सरसकट मदत करण्यात येईल. यानंतर त्याच दिवशी मी सांगितले की, धनंजय मुंडे यांनी जर सरसकट ‘एनडीआरएफ’चे सर्व निकष मोडून तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली, शेतकऱ्यांना अनुदान दिले तर मी त्यांचा जाहीर सत्कार करणार आहे, असे बजरंग सोनावणे म्हणाले. 

दरम्यान, बीड जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी एवढी उत्सुकता लोकांमध्ये आहे की, कधी निवडणूक जाहीर होते आणि लोकसभेचा निकाल दिला त्या पद्धतीने बीड जिल्ह्यातील विधानसभेचा निकाल आम्ही कधी देतो, अशी उत्सुकता लोकांमध्ये आहे. अद्याप परळी विधानसभा मतदारसंघाबाबत आमच्या पक्षाचा कोणता निर्णय झालेला नाही. विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी होत आहे. पक्ष योग्य उमेदवार देईल, असे सोनावणे यांनी सांगितले.
 

Web Title: ncp sp group bajrang sonawane asked that why did dhananjay munde have to go and meet manoj jarange at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.