"आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ..." तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवारांची मिश्किल टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 01:05 PM2024-10-04T13:05:18+5:302024-10-04T13:10:19+5:30
Sharad Pawar News: ज्यांना राज्यात एकही जागा निवडून आणता येत नाही, ते प्रसिद्धीसाठी टीका करतात, असा पलटवार शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांवर केला.
Sharad Pawar News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे पथक दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात १३ ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असे बोलले जात आहे. यातच महाविकास आघाडी आणि महायुती यांना सक्षम पर्याय देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडली आहे. यावर शरद पवार यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात १८ ठिकाणी सभा झाल्या, त्यातील १४ जागांवर भाजपाचा पराभव झाला होता. त्यामुळे आमची पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती असेल की, त्यांनी राज्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात. आमच्यासाठी त्या फायद्याच्या ठरतील, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला.
जातीय, धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे व माझ्यावर लक्ष ठेवण्याची सूचना भाजपा नेत्यांना केली आहे. पक्ष फोडण्याचे आवाहन ते जाहीर सभेतून करतात. देशाचे गृहमंत्रीच कायदा व सुव्यवस्थेविरोधात बोलत असतील तर या सरकारची भूमिका काय आहे, हे सांगायची गरज नाही. जातीय व धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. यासाठी समविचारी पक्ष, चळवळी व संघटनांनी एकसंधपणे याविरोधात लढायला हवे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
झोप उडाली, भयंकर अस्वस्थ झालो आहोत
तिसरी आघाडी आकार घेत आहे. तिसऱ्या आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीत काही परिणाम दिसेल का, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला होता. राज्यात निर्माण होऊ पाहणाऱ्या तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडविताना पवार म्हणाले की, मोठ्या ताकदीचे नेते असा प्रयत्न करत आहेत. राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत. कधीही जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा परिणाम होणार. संभाजीराजे वगैरे एकत्र आल्यामुळे नक्कीच परिणाम होणार. त्यामुळे आमची झोप उडाली आहे. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता आपले काय होणार असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असा चिमटा काढत मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली.
दरम्यान, आंबेडकरांना एकही जागा जिंकता येत नाही. ज्यांना राज्यात एकही जागा निवडून आणता येत नाही, ते प्रसिद्धीसाठी अशी टीका करीत असतात, असा पलटवार शरद पवार यांनी केला. मराठा आरक्षणाला पाठींबा दिल्याने शरद पवार आता मराठ्यांचे नेते आहेत, हे सिद्ध झाले, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. याला शरद पवार यांनी उत्तर दिले.