“आमचा ८० टक्के स्ट्राइक रेट, विधानसभेला १८० जागा निवडून येतील”; जयंत पाटील यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 04:51 PM2024-06-06T16:51:36+5:302024-06-06T16:51:53+5:30
NCP SP Group Jayant Patil News: लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे काम केले. त्यांनी असे उद्गार का काढले, ते माहिती नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
NCP SP Group Jayant Patil News: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आले. तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १० जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी ८ जागा मिळाल्या. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. कारण, विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत आता दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यामुळे आमचा ८० टक्के स्ट्राईक रेट राहिला. आम्ही दोन जागा अधिक लढवल्या असत्या तर अधिक जागा मिळाल्या असत्या. आगामी विधानसभा निवडणुकीत १८० पेक्षा अधिक आमदार आमचे निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. विधानसभेला आता साडे तीन महिने आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत आम्ही १८० ते १८५ जागा सहज निवडून येऊ, असे भाकित संजय राऊतांनी केले आहे.
जे तिकडे गेले, त्यांच्या मानसिकतेत बदल होताना दिसतो
सुप्रिया सुळे यांना बारामतीत ४८ हजारांचा लीड मिळाला आहे. त्यामुळे लोकांच्या वेगळ्या भावना आहेत. बरेचसे सोडून गेलेले नेते, आमदार, मंत्री म्हणत आहेत की, आम्हाला परत शरद पवार यांच्यासोबत काम करायचे आहे. मात्र, यासंदर्भात निर्णय झालेला नाही. जे तिकडे गेले, त्यांच्या मानसिकतेत बदल होताना दिसत आहे, असे चित्र असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती भाजपा नेतृत्वाला केली आहे. यासंदर्भात बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी उद्विग्न होऊन असे उद्गार का काढले हे माहिती नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. दिल्लीत बसलेले लोक त्यांचे भविष्य ठरवू शकतात. महाराष्ट्रातली परिस्थिती, दोन पक्ष फोडल्यामुळे, सोबतच महागाई, बेकारी, जीएसटी यामुळे जनता त्रस्त झाली होती. महाराष्ट्रातील कहाणी याच्याही पुढे आहे. राज्याच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागल्या आहेत. लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे काम केले. मात्र आता तो त्यांचा तो निर्णय आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.