“सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसांवर आले”; जयंत पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 22:27 IST2025-04-07T22:26:59+5:302025-04-07T22:27:23+5:30
NCP SP Group Jayant Patil News: सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले जात आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

“सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसांवर आले”; जयंत पाटलांची टीका
NCP SP Group Jayant Patil News: सोमवारचा दिवस भारतीयांसाठी एकामागून एक धक्के देणारा ठरला. सकाळी शेअर बाजारात हाहाकार उडाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स ३००० अंकांनी घसरला तर निफ्टीने १२०० अंकांनी खाली आला. मात्र, बंद होताना बाजार काहीसा सावरला. या धक्क्याने गुंतवणूकदारांचे १९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेचे तीव्र पडसाद जगासह भारतीय शेअर बाजारावर उमटल्याचे पाहायला मिळाले. यातच पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात केंद्र सरकारने दोन रुपयांची वाढ जाहीर केली. तसेच त्यानंतर लगेचच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी वाढवली तसेच गॅस सिलिंडरचे दरही वाढवले. यामुळे महागाई वाढून सामान्य जनतेच्या खिशाला मोठा भूर्दंड पडला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सामान्य माणसाचे कंबरडे मोडले जात आहे
आज सकाळीच शेअर मार्केट गडगडले आणि सामान्य मध्यमवर्गीय माणसाला त्याचा धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नाही तोच आज केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर २ रुपये एक्साईज ड्युटी वाढवली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलही महाग होणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीतही ५० रुपयांची वाढ झाली आहे. उद्यापासून नवीन किमती लागू होणार आहे. सरकारने आखलेल्या चुकीच्या धोरणांचे ओझे सामान्य माणसाला हाकावी लागत आहे. त्यात सामान्य माणसाचे कंबरडे मोडले जात आहे, असे ते म्हणाले
दरम्यान, जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहे. भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक झीजिया कर आकारून जनतेची लूट करत आहे. क्रूड ऑईलचे कमी झालेले दर व कररुपी लूट कमी केली तर पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटर करणे शक्य आहे ते सरकारने करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.