“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 02:42 PM2024-09-19T14:42:15+5:302024-09-19T14:45:15+5:30

NCP SP Group Jayant Patil News: महाराष्ट्रात भाजपाला अप्रत्यक्षरित्याही कोणती मदत होणार नाही, याची काळजी बच्चू कडू घेतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

ncp sp group jayant patil give offer bacchu kadu should come to maha vikas aghadi rather than tisri aghadi | “बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर

“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर

NCP SP Group Jayant Patil News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाच्या चर्चा पुढे सरकताना पाहायला मिळत आहेत. राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच महायुती आणि महाविकास आघाडीला एक पर्याय म्हणून आता तिसरी आघाडी केली जात आहे. छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी पुढाकार घेऊन तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भातील एक बैठकही घेण्यात आली. याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

सध्या महाराष्ट्राला अजून एका चांगल्या पर्यायाची गरज आहे. एक सक्षम पर्याय म्हणून तिसरी आघाडी असेल. महाविकास आघाडी आणि महायुती सरकार अपयशी ठरली आहे. मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत तिसऱ्या आघाडीच्या सहभागाविषयी सकारात्मक असल्याचे राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. या घडामोडींवर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे

बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे, अशी आमची इच्छा आहे. बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही स्वागतच करू. आम्ही भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याविरोधात महाराष्ट्रात एका आघाडी तयार केली आहे. पण आमच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक उभे राहत आहेत, त्यांना भाजपाचा पाठिंबा आहे. अशा कोणत्याही प्रकाराला बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी बळी पडणार नाही, असा मला विश्वास आहे. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही, याची काळजी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सत्ताधारी पक्षातून काही लोक आमच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची माहिती आमच्याकडे आलेली आहे. एक देश एक निवडणूक लागू करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो आहे. ते तितके सोपे नाही. अलीकडेच झालेली लोकसभा निवडणूक बघितली, तर सरकरला सात टप्पात निवडणूक घ्यावी लागली. याचा अर्थ सरकार एका वेळी निवडणूक घेऊ शकत नाही, हे सिद्ध झाले आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
 

Web Title: ncp sp group jayant patil give offer bacchu kadu should come to maha vikas aghadi rather than tisri aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.