लाडकी बहीण योजना बंद होणार का? जयंत पाटलांचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही सत्तेत आल्यास....”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:58 PM2024-10-17T12:58:11+5:302024-10-17T12:59:10+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण योजने’वर होणाऱ्या खर्चावरून महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. सर्व पक्षांच्या बैठका, जागावाटप, उमेदवार यांबाबतची लगबग सुरू झाली आहे. यातच लाडकी बहीण योजनेबाबत राज्यभरात चर्चा सुरू आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
लाडकी बहीण योजनेत नोंदणी करण्यात आलेल्या बहिणींना सरकारकडून आता ३ हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. या योजनेविरोधात विरोधक न्यायालयात गेले आहेत. ही योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयात गेले आहेत. महाविकास आघाडी आमच्या सर्व योजना बंद करण्याची भाषा करीत आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचा हात लावला तर याद राखा. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे. आमच्या लाडक्या बहिणी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले होते. यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या योजनेबाबत सूचक विधान केले आहे.
आमचे सरकार आल्यास आम्ही...
‘लाडकी बहीण योजने’वर होणाऱ्या खर्चावरून महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जातेय. आम्ही सत्तेत आल्यावर या योजनेचा आढावा घेऊन ती सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय केला जाणार असल्याचे काही नेत्यांनी म्हटल्याचे सांगितले जात होते. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर संकट तयार झाले असून, ही योजना म्हणजे केवळ महिला वर्गास खूश करत मते मिळवण्याचा महायुतीचा डाव असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. अशातच आमचे सरकार आल्यास आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. उलट दीडऐवजी दोन हजार रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ, असे जयंत पाटील यांनी सांगितले. ते शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.
दरम्यान, महाराष्ट्र आता सामान्य लोकांच्या हातात द्यायचा की आणखी कोणाच्या हातात द्यायचा. आता या सरकारने रोज एक नवीन योजना आणायला सुरुवात केली आहे. या सरकारने बहिणींसाठी एक योजना आणली आहे. कोणालाही आपल्या बहिणीसाठी आस्था असतेच. बहीण ही आपली जीवा भावाची सर्वात महत्वाची व्यक्ती असतेच म्हणून बहिणीचा सन्मान केला की माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्यांना आनंद होतोच. पण, एक गंमत आहे की, यांना दहा वर्षात बहीण आठवली नाही, पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार होते. तेव्हा यांना बहीण दिसली नाही, नंतरच्या काळात बहीण दिसली नाही. बहीण दिसली कधी, तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा आम्ही जिंकल्या, त्याचा परिणाम असा झाला की यांना बहीण आठवली. त्या आधी यांना बहीण आठवली नव्हती, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली होती.