“राज्यातील राजकारण सत्ताधाऱ्यांनी गलिच्छ केले, मराठा आंदोलन...”; सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 08:16 PM2024-06-23T20:16:34+5:302024-06-23T20:16:54+5:30

MP Supriya Sule News: देशातील अनेक राज्यांतून आरक्षणावर चर्चा होत असून, गेल्या दहा वर्षांत केंद्राने काय केले, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

ncp sp group mp supriya sule criticized central and state govt over neet exam and reservation issues in maharashtra | “राज्यातील राजकारण सत्ताधाऱ्यांनी गलिच्छ केले, मराठा आंदोलन...”; सुप्रिया सुळेंची टीका

“राज्यातील राजकारण सत्ताधाऱ्यांनी गलिच्छ केले, मराठा आंदोलन...”; सुप्रिया सुळेंची टीका

MP Supriya Sule News: सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचे राजकारण अतिशय गलिच्छ केले आहे. घरे फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा, ५० खोके एकदम ओके. मराठी माणूस स्वाभिमानी आहे, ५० खोके नॉट ओके. त्यांनी ५० खोके वाल्यांना केव्हाच रिजेक्ट केले. देवेंद्र फडणवीस आमच्या घरापाशी येऊन म्हणाले होते, पहिल्या पंधरा दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. तसेच नीट परीक्षेच्या गोंधळावरूनही हल्लाबोल केला.

पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकारने बघितला पाहिजे. हे सरकार उपोषणाला दहा-पंधरा दिवसांपर्यंत का खेचते, असा सवाल करत, मराठा असो, धनगर, लिंगायत, मुस्लिम कोणत्याही समाजाचा आरक्षणाचा विषय असू दे, लवकर निर्णय घेतला पाहिजे. त्यांचे दहा वर्ष केंद्र सरकारमध्ये ३०० खासदार आहेत. बाकीच्या राज्यांची आरक्षणाची चर्चा होते, महाराष्ट्राची का होत नाही. देशात जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे, ती सगळी बिल मागवा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच दहा वर्षे त्यांनी केंद्रात सत्ता असून काय केले, असा थेट सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

नीट परीक्षेचा प्रश्न संसदेत मांडणार

एंटरन्स परीक्षेत होणारे घोळ, पेपरफुटीचे प्रकरण सातत्याने सुरु आहे. तलाठ्याच्या परीक्षेपासून डॉक्टरांच्या परीक्षेपर्यंत हेच होत आहे. प्रशासन तोंडावर पडते आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. अधिवेशनही सुरु होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडीचे तीस खासदार मिळून याबद्दल आवाज उठवू. संपूर्ण ताकदीने आम्ही NEETचा प्रश्न, महिलांवरचे अत्याचार, शेतकरी यांचे प्रश्न आम्ही मांडणार आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

दरम्यान, पुण्यातील पोर्शची जी केस आहे त्यातही आपल्याला संपूर्ण चित्र स्पष्ट झालेले नाही. रक्ताचे नमुने बदलण्यात आले. गृहमंत्रालयाचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन गंभीर नाही. त्यामुळे लोकांचा गृहमंत्रालयावरचा विश्वास उडत चालला आहे. पोलिसांबद्दल हे म्हणत नाही. पोलिसांवर माझा विश्वास आहे. पण जे सरकारमधले लोक, यंत्रणा ती पूर्णपणे अपयशी झाली आहे हेच दिसते आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

 

Web Title: ncp sp group mp supriya sule criticized central and state govt over neet exam and reservation issues in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.