एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आहेत की भाजपामध्ये? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी तुम्हाला सांगते...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 02:33 PM2024-08-22T14:33:04+5:302024-08-22T14:35:42+5:30
NCP SP Group MP Supriya Sule News: एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत की भाजपात, यावरून दोन्ही पक्षांतील नेते दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत.
NCP SP Group MP Supriya Sule News: आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. जागावाटपावरून आता चर्चा, बैठकांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. एकनाथ खडसे नेमके कुणाच्या बाजूने आहेत, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट शब्दांत भाष्य केले आहे.
एकनाथ खडसेभाजपात येण्यास उत्सुक आहेत. लोकसभा निवडणुकीपासून त्याचा भाजपा प्रवेश होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यासाठी एकनाथ खडसे यांनी थेट दिल्ली गाठत भाजपातील वरिष्ठ नेते आणि पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेतल्याचे म्हटले जात होते. परंतु, महाराष्ट्र भाजपातील काही नेते एकनाथ खडसे यांना परत घेण्यास फारसे इच्छुक नसल्याने त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडत असल्याचे सांगितले जाते. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार का? हे मला विचारण्यापेक्षा...
एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात आहेत का, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला होता. यावर, मला याबाबत माहिती नाही. माहिती घेऊन मग मी तुम्हाला सांगते. एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला का, ते भाजपात प्रवेश करणार का, हे मला विचारण्यापेक्षा एकनाथ खडसेंना विचारले तर लवकर उत्तर मिळू शकेल. ते जर राजीनामा दिला असे म्हणत असतील तर आमच्या रेकॉर्डला असेल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, भाजपमध्ये प्रवेश करणार का, हे तुम्हीच त्यांना विचारा. खडसेंची डायरेक्ट वरती लाईन आहे. सुप्रिया सुळे यांना माहिती नाही, जयंत पाटलांना माहिती नाही, शरद पवारांनाही माहिती नाही. त्यापेक्षा त्यांनाच जाऊन विचारा त्यांचे स्टेटस नक्की काय, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. यावेळी एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला, आगामी विधानसभा निवडणुकीत आपली कन्या रोहिणी खडसे यांच्या उमेदवारीसाठी एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष प्रवेश लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे.