“रवींद्र धंगेकरांना खरे भाजपात जायचे होते, २०२९ला विधानसभा उमेदवारीसाठी शिंदेसेनेत गेले”
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:32 IST2025-03-11T13:32:30+5:302025-03-11T13:32:47+5:30
NCP SP Group Rohit Pawar News: २०२९ला होणारी विधानसभा निवडणूक महायुतीतील तीनही पक्ष वेगवेगळी लढणार आहेत. त्यामुळे रवींद्र धंगेकरांनी आमदारकीसाठी भाजपात जाण्याऐवजी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला, असा दावा करण्यात आला आहे.

“रवींद्र धंगेकरांना खरे भाजपात जायचे होते, २०२९ला विधानसभा उमेदवारीसाठी शिंदेसेनेत गेले”
NCP SP Group Rohit Pawar News: काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. २०२३ च्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला होता. शिवसेनेचा नगरसेवक म्हणून मी १० वर्षे काम केले आहे. परिवारामध्ये पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. आता जुन्या सहकाऱ्यांसोबत पुन्हा काम करण्याचा प्रवास सुरू होत आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी पक्षप्रवेश करताना दिली होती. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी वेगळाच मुद्दा याबाबत मांडला आहे.
रवींद्र धंगेकर एक चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांनी विकास कामे करण्यासाठी शिंदे गटात जात असल्याचे सांगितले आहे. कोणती शैक्षणिक की समाज उपयोगी कामे थांबली आहेत म्हणून निघाले आहेत? शिंदे गटात, अजित पवार यांच्या पक्षात हे जे प्रवेश सुरू आहेत, हे प्रवेश भीतीपोटी सुरू आहेत. रवींद्र धंगेकर खरेतर का गेले हे त्यांनी त्यांच्या दैवताला स्मरुन सांगायला पाहिजे. खरोखर कामासाठी गेलो की कसबा मतदारसंघात गणेश पेठेत एक जागा आहे, ही प्रतिभा रविंद्र धंगेकर आणि पार्टनर इतरांच्या नावावर आहे. त्या जागेची किंमत ६० कोटी रुपये आहे. ही जागा विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकी काळात भाजपाने मुस्लिम समाजातील काही लोकांना हाताशी धरुन कोर्टात गेले. त्यात त्यांचे काम अडवण्यात आले, प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवली. त्यांच्या पत्नीच्या अटकेच्या भीतीने आमचे प्रिय रवींद्र धंगेकर शिंदे गटात गेले आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला. यानंतर विधान भवनात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी वेगळा मुद्दा मांडला आहे.
२०२९ला विधानसभा उमेदवारीसाठी शिंदेसेनेत गेले
एकनाथ शिंदे यांच्यावर अन्याय होत असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर दबदबा निर्माण केला होता. नवी मुंबईतील एकनाथ शिंदे यांचा दबदबा कमी करण्यासाठी गणेश नाईक यांना मंत्री करण्यात आले. रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. अशी चर्चा आहे की, खरेतर रवींद्र धंगेकर यांना भाजपामध्ये जायचे होते. परंतु, त्या भागातील भाजपाचे आमदारकीचे उमेदवार थोडे वरचढ आहेत. सगळ्यांना आता अंदाज आला आहे की, २०२९ ला होणारी विधानसभा निवडणूक महायुतीतील तीनही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. त्यामुळे भाजपामध्ये गेले तर, आमदारकीचे तिकीट मिळणार नाही, याची खात्री रवींद्र धंगेकरांना होती. परंतु, शिवसेना शिंदे गटात गेले की, २०२९ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला आमदारकीसाठी उभे राहता येईल, असा विचार रवींद्र धंगेकरांनी केला, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला.
दरम्यान, असा प्रकार केवळ इथेच सुरू आहे, असे समजू नका. कोकणातही यांचा उमेदवार जिथे निवडून आला आहे, तिथे एकनाथ शिंदे यांनी पर्यायी उमेदवार उभा केला आहे. तसेच शिंदे गटातील असे अनेक नेते जे आताच्या घडीला एकनाथ शिंदेंसोबत आहेत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. अशा नेत्यांनाही पर्याय उभे करण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. यावरून २०२९च्या विधानसभेत होणारी लढाई जबरदस्त आणि ताकदीची होणार आहे. त्याचीच सुरुवात महायुतीत आतापासून सुरू करण्यात आली आहे, असा दावाही रोहित पवारांनी केला आहे.