“होय, रात्री २.३० वाजता मनोज जरांगेंना भेटलो”; रोहित पवारांची कबुली, भुजबळांना दिले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 07:25 PM2024-09-14T19:25:58+5:302024-09-14T19:27:19+5:30
NCP SP Group Rohit Pawar Replied Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील यांना धीर दिला, यात चुकीचे काय आहे का? असा प्रतिप्रश्न रोहित पवार यांनी केला.
NCP SP Group Rohit Pawar Replied Chhagan Bhujbal: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रत्युत्तर देत थेट खुले आव्हान दिले आहे.
माझ्या माहितीप्रमाणे अंतरवालीत दगडफेक झाली आणि त्यानंतर लाठीचार्ज झाला, तेव्हा मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. परंतु, रात्री दोन वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा तिकडे आणून बसवले. यानंतर तिकडे शरद पवार गेले, मग उद्धव ठाकरे गेले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पोलिसांवर दगडफेक झाल्याची कल्पना नव्हती. आंदोलकांच्या दगडफेकीत ८० पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी अंतरवाली सराटीत स्वसंरक्षणासाठी लाठीचार्ज केला, असा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केला होता. याला रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट ट्विट करत उत्तर दिले.
होय, रात्री २.३० वाजता मनोज जरांगेंना भेटलो
सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर २ सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्याने त्या भागात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते, त्यामुळे मी स्वतः रात्री अडीच वाजता जाऊन त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला. जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला, यात चुकीचे काय आहे का? असा प्रतिप्रश्न रोहित पवार यांनी केला.
माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा
ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या भाजपला टोकाचा विरोध करणारा आपल्यासारखा जेष्ठ नेता माझ्यावर तसेच राजेश टोपे साहेबांवर ‘ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत त्याच नेत्याच्या’ हातात गृहमंत्रालय आहे. त्यामुळे त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा, हे माझे आपणास जाहीर आव्हान आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, असो! हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्यामुळे दोन समाजात भांडणे लावण्याचा उचललेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या तसेच भाजप नेत्यांच्या नादाला लागून महाराष्ट्राची वाट लावण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष द्या, ही विनंती, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला.