“महायुतीतील आमदार मागे लागलेत, मंत्रिपदाचे स्वप्न २ महिने तरी पूर्ण होऊ दे”: जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 14:12 IST2024-07-18T14:05:27+5:302024-07-18T14:12:08+5:30
NCP SP Jayant Patil News: अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती. यावरून जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला.

“महायुतीतील आमदार मागे लागलेत, मंत्रिपदाचे स्वप्न २ महिने तरी पूर्ण होऊ दे”: जयंत पाटील
NCP SP Jayant Patil News: विशाळगडाच्या पायथ्याला घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. लोकांना वरती जाऊ न दिल्याने त्यांनी तेथील धार्मिक स्थळावर हल्ला केला. लोकांची घरे फोडून, तिजोऱ्या लुटून संपत्ती नेली. शिवप्रेमींचे लक्षण नसून पुण्यातील किंवा कुठूनतरी वेगळ्या ठिकाणावरून आलेले गुंड आहेत. अशा पद्धतीने कोणाच्याही घरात घुसून घर फोडायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल. त्यामुळे सरकारचे हे मोठे अपयश आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली.
आता परत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, ही शेवटची संधी आहे, असे काही आमदारांना वाटते आहे. त्यामुळे अनेक आमदारांचे मंत्रिपदाचे स्वप्न किमान दोन महिने तरी पूर्ण होऊ दे. यासाठी अनेक जण मागे लागले आहेत, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला. राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेक चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाले. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तारावर कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती.
लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल निर्णय होईल
लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, काळजी करु नका. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असे काहीच नाही. लवकरच याबद्दलची बातमी देईन. लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल निर्णय होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, भेदभाव करणार नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, अन्यथा अनेक आमदार नाराज होतील. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी काय हरकत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.