“महायुती सरकारने १ रुपया निधी दिला नाही, अजितदादांच्या पीएला १०० फोन केले”: जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 01:26 PM2024-07-11T13:26:57+5:302024-07-11T13:27:36+5:30
Jitendra Awhad News: घरकामासाठी नको. मतदारसंघातील गरीब लोकांच्या कामासाठी पैसे हवे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
Jitendra Awhad News: निधीसंदर्भात वर्षभरापूर्वी अजित पवार यांना निवेदन दिले होते. अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या पीएला १०० वेळा फोन केला. मात्र, आजपर्यंत त्यांनी भेटीसाठी वेळ दिलेली नाही. मला पैसे माझ्या घरकामासाठी नको. मतदारसंघातील गरीब लोकांच्या कामासाठी पैसे हवे. आमदाराला तीन वर्षांत त्याच्या मतदारसंघातील कामासाठी एक रुपयाही देत नाही, ही कुठली पद्धत आहे, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शिंदे सरकारने आजपर्यंत एक रुपयांचा निधी दिलेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना होत जोडून विनंती करतो, माझ्या मतदारसंघातील जनताही महाराष्ट्राचे नागरीक आहेत. एक जनप्रतिनिधी म्हणून त्यांच्या विकासासाठी निधी द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. तसेच पुरवणी मागण्या चर्चेविना मंजूर करण्यात आल्याबाबत महायुती सरकावर टीकास्त्र सोडले.
राज्यात कधीही समाजिक दरी निर्माण झालेली नाही
राज्य सरकार दोन वर्ष मराठा आणि ओबीसी समाजाला खेळवत होते. तेव्हा राज्य सरकारला विरोधी पक्ष आठवला नाही. महाराष्ट्राचा आजपर्यंतचा इतिहास आहे, राज्यात कधीही समाजिक दरी निर्माण झालेली नाही. शिंदे सरकारला मराठा आणि ओबीसींना भडकावायचे होते. आता काहीच पर्याय नाही, म्हटल्यावर त्यांना विरोधी पक्ष आठवतो आहे. त्यांनी आता आमच्या नावाने खापर फोडण्याचे काम सुरू केले आहे. सरकारकडे बहुमत आहे, सरकारने त्यांचा निर्णय घ्यावा, असे आव्हाड म्हणाले.
दरम्यान, ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील राज्यसभा ठिकठिकाणी दौरे करत असून, सभा, बैठका घेत आहेत. तर, दुसरीकडे सगेसोयरेंचा अध्यादेश काढल्यास मुंबई जाम करू, असा इशारा ओबीसी आंदोलकांकडून देण्यात आला आहे. सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीला जाण्यास नकार दिला.