“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 06:26 PM2024-07-04T18:26:09+5:302024-07-04T18:27:04+5:30
Rohit Patil News: आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
Rohit Patil News: लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या उलथापालथीमुळे तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील समीकरणेदेखील बदलली आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी विधानसभेची तुतारी फुंकण्याची तयारी केली असून, कार्यकर्त्यांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच रोहित पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सूचक विधान केले आहे.
मतदारसंघात अनेक दिवसांपासून काम करत आहे. दौरे करत आहे, लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत. आर. आर. पाटील यांना काही कामे करायची होती. परंतु, त्यांचे निधन झाल्यामुळे ती झाली नाहीत. ती कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांच्या आशा या कामाच्या माध्यमातून पूर्ण झाल्या पाहिजेत, असे मत रोहित पाटील यांनी व्यक्त केले. तसेच आर. आर. पाटील यांनी एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विरोधकांनी तो प्रकल्प थांबवला. मात्र, सहा महिन्यांपूर्वी तासगाव कवठे महांकाळसाठी एमआयडीसी मंजूर झाली आहे, अशी माहिती रोहित पाटील यांनी दिली.
शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आले पाहिजे
विधानसभेच्या बाबतीत मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आणि शरद पवार तसेच वरिष्ठ नेते मिळून एकत्रितपणे निर्णय घेतील. लोकसभेच्या निवडणूकमध्ये शरद पवार यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मोठा विजय खेचून आणू शकले. आगामी विधानसभेला आम्ही त्याच पद्धतीने सामोरे जाणार आहोत. कुठल्याची परिस्थितीत शरद पवार यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष राहिला पाहिजे, अशी अपेक्षा रोहित पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून रोहित पाटील यांनी मतदारसंघात साखर पेरणी केली आहे. मात्र, विरोधी महायुतीकडून विधानसभेला निवडणुकीच्या रिंगणात कोण असणार हे अद्याप निश्चित नाही.