"शिंदे गटाची बाळासाहेबांशी आस्था की लालसा, हे जनतेला माहिती" महेश तपासेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 08:53 PM2022-08-11T20:53:38+5:302022-08-11T20:54:05+5:30
Mahesh Tapase : शिंदे गटात सध्या चढाओढ सुरू असून एकवाक्यता नसल्याने हे सरकार अधिवेशनाला कसे सामोरे जाणार? हा खरा प्रश्न आहे असेही महेश तपासे म्हणाले.
मुंबई : ईडी सरकारमधील मंत्र्यांनी आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. हे दर्शन आस्थेपोटी घेतले असते, तर त्यांनी शिवसेना फोडली नसती. शिवसेनेत बंड करायचे आणि आस्था आमची बाळासाहेबांशी आहे, हे दाखवायचं यामध्ये आस्था किती आणि लालसा किती? हे राज्यातील जनतेला कळून चुकलं आहे, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळापासून काही अंतरावर आहे. परंतु ज्या लोकांकडून भारतीय राज्यघटनेची पायमल्ली केली गेली आहे. त्यांच्याकडून स्मारकाचे दर्शन घेतले जाईल का? हा विचार करणं चुकीचं आहे. ज्यांना घटनाच मान्य नाही, ते डॉ. बाबासाहेबांचा काय आदर करणार? असा खोचक टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.
याचबरोबर, ईडी सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतली. परंतू कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाती असणार आहे. याची स्पष्टता दिसत नाही. शिंदे गटावर भाजपचा दबाव असल्याने शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती देऊन भाजप आपल्याकडे वजनदार खाती ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटात सध्या चढाओढ सुरू असून एकवाक्यता नसल्याने हे सरकार अधिवेशनाला कसे सामोरे जाणार? हा खरा प्रश्न आहे असेही महेश तपासे म्हणाले.