भुजबळांना आठवला बाळासाहेबांचा बाणा, शिवसेना-भाजपाला हाणला टोला!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 05:07 PM2019-01-10T17:07:51+5:302019-01-10T17:12:05+5:30
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय.
'युती होगी तो ठीक, नही तो पटक देंगे', असं वक्तव्य अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरेंपुढे केलं असतं तर त्यांनी शहांना अशी लाथ मारली असती, की ते मुंबईत परत आले नसते, असा सणसणीत टोला लगावत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज भाजपा-शिवसेनेवर निशाणा साधला.
युती करायची तर करा, लोकांना का फसवता?, असे खडे बोलही त्यांनी दोन 'मित्रां'ना सुनावले.
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. जागावाटपाची चर्चा सकारात्मक सुरू असून आघाडीची घडी बसण्याची चिन्हं आहेत. त्यापाठोपाठ आता प्रचाराच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं निर्धार परिवर्तन यात्रेचा शंख फुंकला आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही यात्रा सुरू केली. त्यावेळी छगन भुजबळ यांची तोफ चांगलीच धडाडली.
'यांची डिग्री फेल, लग्न फेल, घर फेल, चाय फेल, गुजरात मॉडेल फेल, नोटाबंदी फेल, मेक इन इंडिया फेल आणि आता राफेल', अशी खिल्ली उडवत भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. अनिल अंबानी यांनी खेळण्यातले विमानही कधी बनवलं नाही आणि त्यांना यांच्या सरकारने कंत्राट दिलं, अशी चपराक त्यांनी लगावली.
'अच्छे दिन'चा पोकळ ढोल बडवणाऱ्या भाजपा-सेना युती सरकारचा ढोल आता राष्ट्रवादी काँग्रेस बडवणार, असा निर्धार करत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ढोल वाजवला.
राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पाचाड येथील समाधीला अभिवादन करून निर्धारपूर्वक परिवर्तन यात्रेची वाटचाल पुढे सुरू.#परिवर्तनयात्रा@Jayant_R_Patil@AjitPawarSpeaks@dhananjay_munde@ChhaganCBhujbal@SunilTatkarepic.twitter.com/jsk0IktH7G
— NCP (@NCPspeaks) January 10, 2019