राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या वाटेवर; शिवसेना नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 01:52 PM2023-06-20T13:52:28+5:302023-06-20T13:57:27+5:30
एवढेच नाही, तर शरद पवार यांनी जेव्हा आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील का रडत होते, हे तुम्हाला माहीत आहे का? असा सवाल करत, यावरूनही शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा दावा शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. एवढेच नाही, तर शरद पवार यांनी जेव्हा आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील का रडत होते, हे तुम्हाला माहीत आहे का? असा सवाल करत, यावरूनही शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिरसाट म्हणाले, "राष्ट्रवादीला आमचा पुळका का आला आहे? हे कळायला मार्ग नाही. जे जयंत पाटील आज स्वतःच भाजपच्या वाटेवर आहेत, ते असे म्हणतात. ज्या पक्षाची स्थापनाच मुळात गद्दारीतून झाली आहे. सोनिया गांधी यांच्या सोबत केलेली गद्दारी, त्यातून निर्माण झालेले हे सर्व आणि ते आम्हाला आता गद्दारीची भाषा शिकवणार, हा संपूर्ण हास्यास्पद प्रकार आहे. त्यामुळे आम्ही त्यांची चिंता करत नाही, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझासोबत बोलत होते.
शरद पवार यांनी जेव्हा राजीनामा दिला, तेव्हा जयंत पाटील का रडत होते हे तुम्हाला माहीत आहे? त्यांना उद्या काय घडणार हे माहीत आहे. त्यामुळे आता काय करू, शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा दिला, तर मी तर मेलोच. म्हणून ते ओक्साबोक्सी रडत होते. ते शरद पवार यांच्या राजीनाम्यावर रडत नव्हते. त्यांचं रडणं वेगळं होतं. तुम्हाला सांगतो, असं बोलणारे पटकन उड्या मारतात. त्यामुळे काही दिवस वाट पाहा, तुम्हाला त्यांचे मार्गक्रमण कुठे तरी झालेले दिसेल, असेही शिरसाट म्हणाले.
जयंतराव पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं होतं असं आवाहन -
जयंत पाटील यांनी, "खोक्यांचे राजकारण करून धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली आहे. यासाठी गद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के, ही घोषणा राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत देऊन या खोके सरकारचा निषेध व्यक्त करावा. शिंदे सरकार हे खोक्यांमुळेच ओक्के केले असल्याने या सरकारचे हे क्षणिक सुखाला उतरती कळा लागली आहे, हा विश्वास जनतेला पटवून देण्याचा निर्धार करावा. शहराच्या प्रमुख ठिकाणी या खोके सरकारविरोधात प्रतिकात्मक खोक्यांचा देखावा उभा करावा. अशाप्रकारे पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिळून या दिवसाचा निषेध व्यक्त करावा," असे म्हटले आहे.