Jayant Patil : "काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता तेव्हाच..."; ईडीच्या नोटिशीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 11:52 AM2023-05-11T11:52:13+5:302023-05-11T12:00:07+5:30
Jayant Patil : आज राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल असताना जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याच दरम्यान आता ईडीच्या नोटीशीनंतर जयंत पाटलांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना नोटीस धाडल्याची माहिती समोर येत आहे. आज राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल असताना जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याच दरम्यान आता ईडीच्या नोटीशीनंतर जयंत पाटलांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याच्यात ईडीने मला नोटीस पाठवली, सहाला ती माझ्या घरी आली. नोटीसमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. फाईल काढून पाहिल्या तर असं दिसतंय आयएसएफएल नावाची कुठलीतरी संस्था आहे आणि त्यासंबंधीत काही केस आहेत. त्याच्याशी माझा कधी आयुष्यात संबंध आला नाही. कधी त्यांच्या दारात गेलो नाही, कधी लोन घेतलं नाही. त्यामुळे माझा काही संबंध नाही. पण आता बोलावलंय तर चौकशीला सामोरी जाऊ."
"घोटाळे करण्याचा कार्यक्रम मी कधी केलेला नाही"
"दोन तीन दिवस जरा लग्नसराई आहे, घरातली जवळची लग्न आहेत. त्यामुळे ईडीकडे ही लग्न झाल्यानंतरची वेळ मागवणारं पत्र मी आज पाठवून देईन. ईडीची नोटीस कशाला येते हे भारतात सर्वांना माहितीय. त्यामुळे नोटीस येणं, त्याला उत्तर देणं हे सर्व करू. माझं राजकीय आयुष्य हे उघडी किताब आहे. माझा काही प्रॉब्लेम नाही. घोटाळे करण्याचा कार्यक्रम मी कधी केलेला नाही. आवश्यक असलेली माहिती मी देईन. मनीलॉड्रींगटाईप काम कधीच केलेलं नाही. त्यामुळे काही अडचण वाटत नाही" असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही याआधीही या कंपनी प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.