“जर आमचा आमदार फुटला तर ‘तो’...”; राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा स्पष्ट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 03:59 PM2022-03-19T15:59:02+5:302022-03-19T15:59:34+5:30
भाजपला पंचाईत ही आहे की त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहतील याची काहीच त्याना शाश्वती नाही असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला आहे.
मुंबई – महाविकास आघाडीचे २५ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा करत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा धुरळा उडवून दिला आहे. दानवेंच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याही आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर भाजपाचे ५० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा प्रतिदावा केला आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराज आमदारांना स्पष्ट इशारा दिला आहे.
मंत्री जयंत पाटील(NCP Jayant Patil) म्हणाले की, आमचे आमदार फुटणे शक्य नाही. जर फुटला तर तो परत विधानसभेत दिसणार नाही. लोकंच सळो की पळो करून सोडतील. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी भाजपच्या आमदारांना मोठा निधी दिला. फडणवीस यांनी जितका निधी दिला त्याच्यापेक्षा जास्त निधी आम्ही दिला आहे तसे फोन करुन भाजप आमदार आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे आमचे आमदार फुटणे शक्य नाही. जर फुटला तर तो परत विधानसभेत दिसणार नाही. तिन्ही पक्ष एकत्र आले तर कदापी त्या आमदाराला शक्य नाही. भाजपाने आपल्या बुडाखाली काय जळतंय ते पाहावे असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच भाजपला पंचाईत ही आहे की त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहतील याची काहीच त्याना शाश्वती नाही. त्यामुळे त्यांची पंचाईत झाल्याने भीती दाखवणे सूरु आहेत. आमचे २५ आमदार बाहेर पडणार आहेत मग आम्ही काय वेडे आहोत का? पुन्हा एक माणूस आम्ही परत निवडून येऊ देणार नाही. एवढं सोप्प नाही राजीनामा द्यायचं आणि बाहेर पडायचं. जो महाविकास आघाडीतून बाहेर पडेल त्याला लोकं सळो की पळो करून टाकतील. ते लोकांना काय सांगणार त्यामुळे अशी कुठलीही घटना घडणार नाही. उलट भाजप आमदार आमच्या सरकारवर खुश आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला आहे.
एमआयएमनं त्यांची भूमिका कृतीतून स्पष्ट करावी
आरोग्य मंत्री राजेश टोपे हे MIM खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचं निधन झाल्यानं सांत्वनासाठी गेले होते अशावेळी राजकीय चर्चा करणे अभिप्रेत नाही.आमची तशी संस्कृती नाही. त्यामुळे अशा चर्चेबाबत बोलणे योग्य नाही. उत्तरप्रदेश असो की महाराष्ट्र असो यामध्ये एमआयएमचा प्रयत्न सिद्ध झाला आहे. आता औरंगाबाद महापालिकेत नेमका काय त्यांचा रोल आहे हे स्पष्ट होईल. पालिका निवडणुकीत ते नेमकं भाजपला जिंकवणार आहेत की हरवणार आहेत ते आता कळेल. उत्तरप्रदेशमधील समाजवादी पार्टीच्या बहुतांश ठिकाणी पराभवाला एमआयएम कारणीभुत आहे. एमआयएमने सिद्ध करायला हवं की त्यांना भाजपच्या विजयात कोणताही रस नाही. त्यांनी समविचारी पक्षाना अपेक्षित भूमिका घ्यायला हवी. त्यांनी विखारी भाषा वापरू नये असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला आहे.