“पालकमंत्रीपदे मिळण्यासाठी राष्ट्रवादीने दबावतंत्राचा वापर केला का?”; सुनील तटकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 10:26 PM2023-10-10T22:26:20+5:302023-10-10T22:27:21+5:30

Sunil Tatkare Exclusive: ओबीसी विरुद्ध मराठा वाद झाला म्हणून नाशिकचा निर्णय झाला नाही का, असा प्रश्न सुनील तटकरेंना विचारण्यात आला.

ncp sunil tatkare reaction about guardian minister posts decision in lokmat exclusive interview | “पालकमंत्रीपदे मिळण्यासाठी राष्ट्रवादीने दबावतंत्राचा वापर केला का?”; सुनील तटकरे म्हणाले...

“पालकमंत्रीपदे मिळण्यासाठी राष्ट्रवादीने दबावतंत्राचा वापर केला का?”; सुनील तटकरे म्हणाले...

Sunil Tatkare Exclusive: गेल्या काही दिवसांपासून सत्तेत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट नाराज असल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक दावे केले जात आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपदे मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दबावतंत्राचा वापर केला का, असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. यावर सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी सुनील तटकरे यांची विशेष मुलाखत घेतली. अजित पवार नाराज झाले, ते सरकारसाठी रिचेबल नव्हते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तत्काळ दिल्लीला गेले. भाजप श्रेष्ठींशी चर्चा केली. त्यानंतर लगेचच पालकमंत्रीपदाचा निर्णय झाला. इथेही राष्ट्रवादी काँग्रेस दबावतंत्राचा वापर करतेय का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की,  बिलकूल नाही. दबावतंत्राचा वापर कालही राष्ट्रवादी काँग्रेस करत नव्हती आणि आजही करत नाही. पालकमंत्री निवडीबाबतची चर्चा १५ ते २० दिवस आधीपासून सुरू होती. अजितदादा खरोखरच आजारी होते. दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. आमच्या आमदारांच्या बैठकीला आणि मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाला अजितदादांनी वेळ दिली होती. मात्र, प्रकृती बरी नसल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. तिसऱ्या दिवशीही मंत्रिमंडळ बैठकीला ते नव्हते. काही महत्त्वाच्या बैठकांसाठी अजितदादा मंत्रालयात आले होते, मात्र, त्यावेळीही डॉक्टर उपस्थित होते, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

ओबीसी विरुद्ध मराठा वाद झाला म्हणून नाशिकचा निर्णय झाला नाही का?

हा दबावतंत्राचा भाग नाही. आम्ही व्यवस्थित एकमेकांशी चर्चा करून संयम आणि समन्वय साधत निर्णय घेत आहोत, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. यावर, ओबीसी विरुद्ध मराठा वाद झाला म्हणून नाशिकचा निर्णय झाला नाही का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, नाशिक असो वा रायगड असो किंवा इतर जिल्ह्यासंदर्भात दीर्घकाळ चर्चा सुरू होती. काही जिल्ह्यांचा प्रश्न सुटू शकला. आता मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यावेळेला सुद्धा पालकमंत्रीपदाबाबत निर्णय होईल. तीनही नेते एकत्रित बसून, त्याबाबतीतील निर्णय करतील, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, या सरकारमध्ये अदिती तटकरे एकमेव महिला कॅबिनेट मंत्री आहेत. असे असताना रायगडचे पालकमंत्रीपद त्यांना का नाकारले जात आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, भरत गोगावले यांची आणि माझी भेट झाली. ही सचिच्छा आणि राजकीय अशा दोन्ही स्वरुपाची भेट होती. आम्ही सत्तेत सहभागी होत असताना, लोकशाही मार्गाने आम्ही सामूहिक निर्णय घेतला. आमच्यासमोर आता एनडीए मजबूत करणे, लोकसभा निवडणुकांना ताकदीने सामोरे जाणे, विधानसभा निवडणुकांना अधिक सामंजस्याचे वातावरण निर्माण करणे अशा गोष्टी आहेत. पालकमंत्रीपद महत्त्वाचे असले तरी या गोष्टींना अधिक महत्त्व आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील, असे सुनील तटकरे यांनी नमूद केले. 

Web Title: ncp sunil tatkare reaction about guardian minister posts decision in lokmat exclusive interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.