“२०१९ मध्येच मविआ सरकार पडले असते, अजित पवारांमुळे टिकले”: सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:06 PM2024-01-10T12:06:00+5:302024-01-10T12:09:18+5:30

NCP Sunil Tatkare News: जितेंद्र आव्हाड हे बेदखल झालेले नेते आहेत, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली.

ncp sunil tatkare replied sharad pawar group jitendra awhad criticism | “२०१९ मध्येच मविआ सरकार पडले असते, अजित पवारांमुळे टिकले”: सुनील तटकरे

“२०१९ मध्येच मविआ सरकार पडले असते, अजित पवारांमुळे टिकले”: सुनील तटकरे

NCP Sunil Tatkare News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, अजित पवार गट आणि शरद पवार गटात संघर्ष तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला आता अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार टिकले, अन्यथा २०१९ लाच ते कोसळले असते, असे मोठे विधान सुनील तटकरे यांनी केले आहे. 

अजित पवार यांना २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री केले ही चूक झाली, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यावर बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, २०१९ मध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकारच टिकले नसते. त्यावेळी गुप्त मतदान झाले असते, तर तेव्हाच ते सरकार पडले असते. अजित पवार हे विरोधी पक्षनेते झाले ते बहुसंख्य आमदारांनी मागणी केल्यामुळे झाले. त्याहीपुढे त्यांचे ऐकले नाही म्हणूनच ५३ पैकी ४३ आमदार आता अजित पवारांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे त्यांचे सामर्थ्य संघटनेत, विधिमंडळात काय आहे हे झारखंडचे एक आमदार, नागालँडचे सात आमदारांच्या पाठिंब्यावरूनच स्पष्ट झाले आहे, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. 

जितेंद्र आव्हाड हे बेदखल झालेले नेते आहेत

निराशेच्या गर्तेत सापडलेली माणसे आणि आयुष्यभर खोटे बोलून स्वतःचे राजकीय महत्त्व वाढवलेली माणसे यापेक्षा काय बोलणार आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. जितेंद्र आव्हाड हे बेदखल झालेले नेते आहेत, या शब्दांत सुनील तटकरे यांनी हल्लाबोल केला. तसेच राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर आपणही पदयात्रा काढावी. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते आहोत, असे दाखवावे, या कारणासाठी काढलेल्या संघर्ष यात्रेला राहुल गांधी यांच्या पदयात्रेपेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्यामुळे कदाचित ते विश्रांतीला गेले असावेत म्हणून त्यांनी पक्षाच्या शिबिराला जाणे टाळले असेल, असा टोला सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना लगावला.

दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे परभणी आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांत दोन मेळावे घेण्यात येणार असून ७ जानेवारीला मुंबई प्रदेश काँग्रेसचा तर, १८ जानेवारीला राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत एकाच वेळी महायुतीचे मेळावे होणार आहेत. राज्यात आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रमुख नेते मार्गदर्शन या मेळाव्यात करतील. याची रुपरेषा ठरवण्यासाठी ५ जानेवारीला समन्वय समिती आणि घटक मित्र पक्षाची बैठक मंत्री दादाजी भुसे यांच्या बंगल्यावर घेणार आहोत, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
 

Web Title: ncp sunil tatkare replied sharad pawar group jitendra awhad criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.