किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 03:30 PM2020-02-11T15:30:33+5:302020-02-11T15:38:52+5:30
शरद पवारांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र
पुणे: मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निघालेल्या मोर्चांविरोधात मोर्चा काढला. आता मोर्चाला मोर्चानं उत्तर दिलंय. यापुढे फार नाटकं केल्यास दगडाला दगडानं आणि तलवारीनं तलवार उत्तर मिळेल, अशा शब्दांत राज ठाकरे आझाद मैदानातल्या सभेतून बरसले. राज ठाकरेंच्या या विधानावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी त्यांना लक्ष्य केलं.
राज ठाकरेंना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. काही जण त्यांचं भाषण ऐकायला येतात, तर काही जण त्यांना पाहायला येतात, असा टोला शरद पवार यांनी लगावला. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करण्यासाठी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं अभिनंदन करताना भाजपावर तोफ डागली.
दिल्लीत भाजपाचा पराभव होणारच होता. दिल्लीत जे घडलं, तेच इतर राज्यांमध्येही घडू शकतं. भाजपाच्या पराभवाची प्रक्रिया सुरू झाली असून आती ती थांबेल, असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टीच निवडून येईल, असं अनेक जण म्हणत होते. त्यामुळे या विधानसभा निवडणूक निकालानं मला आश्चर्य वाटलं नाही. भाजपाचा पराभव होणारच होता. भाजपा देशावरील आपत्ती आहे, अशा शब्दांत पवारांनी भाजपाला लक्ष्य केलं.
भाजपाचा पराभव शक्य आहे. त्यासाठी आम्ही लोकांना पर्याय द्यायला हवा, असं शरद पवार म्हणाले. धार्मिक कटुता लोकांना मान्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांमुळे संसदेत दहशतीचं वातावरण आहे, असंदेखील त्यांनी म्हटलं. तरुणांना रोजगार मिळाला नाही, तर ते पंतप्रधान मोदींना दंडुक्यानं मारतील, असं काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी एका प्रचारसभेत म्हटलं होतं. त्यावर राहुल यांनी असं बोलायला नको होतं, असं मत पवारांनी व्यक्त केलं.